जिल्हा परिषदेच्या शाळा "लय भारी' 

जिल्हा परिषदेच्या शाळा "लय भारी' 

महाड - पोषण आहार, पाठ्यपुस्तके यांच्यासह अन्य सोई-सुविधा दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. यावर महाड तालुक्‍यात विचार मंथन करण्यात आले आहे. या शाळांचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, महाडच्या गटविकास अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न पालकांनाही प्रभावित करीत असून जिल्हा परिषदेच्याच शाळा "लय भारी' असल्याचे वाटू लागले आहे. 

महाड तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे जाळे आहे. या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांपासून शालेय पोषण आहार देण्यात येतो. प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि सुसज्ज इमारती हे या शाळांचे वैशिष्ट्य असतानाही त्या पटसंख्येअभावी ओस पडू लागल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम, आठवीचे वर्ग सुरू करणे, डिजिटल शाळा, ई लर्निंग असे वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषद आपली पटसंख्या टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. 

महाड तालुक्‍यात 10 वर्षांत दर वर्षी सरासरी एक हजाराने पटसंख्या कमी होत आहे. तालुक्‍यात सद्यस्थितीत सात हजार 958 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत. यावर्षी अधिक विद्यार्थी शाळेत दाखल व्हावेत, यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर यांच्या कल्पनेतून बॅनरद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. खासगी शाळा मोठमोठे होर्डिंग्ज व बॅनर्स ठिकठिकाणी लावत असतात; तसेच बॅनर केंद्र व शाळा स्तरावर लावण्यास पंचायत समितीनेही लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची माहिती देणारा आणि पालकांना आवाहन करणारा व्हिडीओ सभापती सीताराम कदम, उपसभापती सुहेब पाचकर व गटशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर यांनी तयार करून तो यू ट्युबवर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसारीत करत आहेत. जिल्हापरिषद शाळा किती छान आहे, भविष्यासाठी आम्ही विद्यार्थी घडवतो ...अशा प्रकारे घोषवाक्‍य तयार करून बॅनर तयार केले आहेत. 

असे आहेत बॅनर 
जिल्हा परिषदेच्या शाळांची महती वर्णन करणाऱ्या बॅनरवर शिक्षकांनी काढलेली शाळांची व विद्यार्थ्यांची छायाचित्रेही छापण्यात आली आहेत. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके व गणवेश, स्वच्छ पाणी, स्वतंत्र शौचालय, अनुभवी शिक्षक यांसह शाळेत मिळणाऱ्या सर्व सवलती यांची माहिती बॅनरवर आहे. 

महाड तालुक्‍यात जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढावी, यासाठी पंचायत समितीकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यशही येत आहे. या वर्षीही जाहिरात माध्यमाचा वापर प्रवेशवाढीसाठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- सुनीता चांदोरकर, गटशिक्षणाधिकारी, महाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com