सिंधुदुर्गात पोलिसांसाठी एक हजार घरे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

सावंतवाडी : जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांना एक हजार नवी निवासस्थाने उभी केली जाणार आहेत. आठ ठिकाणी या वसाहती होणार असून, 250 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही माहिती पोलिस कल्याण गृहनिर्माण प्रकल्पाचे मुख्य अभियंता एन. एम. डेकाटे यांनी दिली. 

सावंतवाडी : जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांना एक हजार नवी निवासस्थाने उभी केली जाणार आहेत. आठ ठिकाणी या वसाहती होणार असून, 250 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही माहिती पोलिस कल्याण गृहनिर्माण प्रकल्पाचे मुख्य अभियंता एन. एम. डेकाटे यांनी दिली. 

श्री. डेकाटे आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यात जवळपास 80 टक्के पोलिस वसाहतींची दयनीय अवस्था आहे. त्यांच्या दुरुस्तीची व पुर्नबांधणीची मागणी अनेक वर्षे सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत लक्ष घातले आहे. त्यांच्या सूचनेनुसार श्री. डेकाटे यांनी आज जिल्ह्यातील पोलिस वसाहतींना भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी त्यांचे स्वागत केले. 

श्री. डेकाटे म्हणाले, ''सावंतवाडीसह बांदा, वेंगुर्ले, निवती, मालवण, कुडाळ, देवगड, ओरोस, आचरा, कणकवलीतील पोलिस ठाणी व वसाहतींची पाहणी केली. काही ठिकाणी पोलिस ठाण्यांच्या इमारती व काही ठिकाणी वसाहती नव्याने उभारणे आवश्‍यक आहे. त्यांचे आराखडे बनवून लवकरच निविदा निघणार आहे.'' 

पोलिस वसाहती आणि पोलिस ठाण्यांची कामे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली जायची; पण आता ही कामे पोलिस कल्याण गृहनिर्माण सोसायटीच करणार आहे. त्यांनी स्वतःचा बांधकाम विभाग निर्माण केला आहे. त्यामुळे ही कामेही याच विभागामार्फत होणार असल्याचे सांगण्यात आले. 

ते म्हणाले, ''ओरोस, सावंतवाडी, कुडाळ, बांदा, वेंगुर्ले, मालवण, देवगड येथे पोलिस वसाहती आहेत; पण पोलिस संख्येच्या तुलनेत या घरांची संख्या कमी आहे. अनेक घरे कोसळण्याची भीती आहे. यामुळे जिल्ह्यात पोलिसांसाठी 1 हजार घरे बांधण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी 250 कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. लवकरच याच्या निविदा निघतील.''

Web Title: proposals for police houses in Sindhudurga gets Fadnavis Cabinet nod