'सेल्फी'च्या निर्णयाला शिक्षक संघाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी - विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षकांनी दर सोमवारी सेल्फी काढण्याच्या शासन निर्णयाला शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. या निर्णयाचा फेरविचार करून निर्णय रद्द करावा अन्यथा सेल्फी निर्णयावर बहिष्कार टाकण्यात येईल आणि संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने राज्य सरकारला दिला आहे.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष म. ल. देसाई यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यात आता दर सोमवारी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेण्याच्या समस्येची भर पडली आहे. शाळांची वीज बिले व अन्य आर्थिक समस्या पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद नाही. शाळांचे मुख्याध्यापक स्वखर्चाने एमडीएम शिष्यवृत्ती, आवेदनपत्रे, सरल प्रणालीमध्ये विद्यार्थी माहिती, विविध प्रकारची माहिती ऑनलाइन भरत आहेत. त्यासाठी अध्यापनाचा वेळ वाया जात आहे. त्यातच आता सेल्फी काढून सरळ प्रणालीमध्ये अपलोड करण्यात वेळ वाया जाणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

सेल्फी आणि इतर ऑनलाइन कामामध्ये अध्यापनाचा वेळ वाया जाणार असल्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या स्तुत्य उपक्रमांतर्गत अपेक्षित असलेली प्रगती साधण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा या निर्णयावर बहिष्कार टाकत आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आला आहे.

Web Title: Protest of teachers for Selfie decision