तहानलेल्यांना थंड पाण्याचा आधार

अमित गवळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

पाली (रायगड) : उन्हाची काहिली वाढली आहे. अशावेळी पाली बाजारात येणाऱ्या लोकांची तहान गार पाण्याने भागविण्यासाठी "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रुपने पुढाकार घेतला. त्यांनी पाली बाजारपेठेत दोन ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवून मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे.

पाली (रायगड) : उन्हाची काहिली वाढली आहे. अशावेळी पाली बाजारात येणाऱ्या लोकांची तहान गार पाण्याने भागविण्यासाठी "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रुपने पुढाकार घेतला. त्यांनी पाली बाजारपेठेत दोन ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवून मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे.

पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. खेड्यापाड्यातील लोक कामानिमित्त पालीत येत असतात. आदिवासी बांधव तसेच हातावर पोट असलेले विक्रेते देखील आहेत. या सगळ्यांची तहान भागावी यासाठी थंड पाण्याची सोय "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रुपच्यावतीने केली आहे. येथील जागृत जैन व पिंट्या गोळे यांच्या दुकानाजवळ थंड शुद्ध पाण्याचे वीस लिटरचे जार ठेवले आहेत. येथील व्यापारी जितेंद्र जैन (सिंघवी) यांनी रोजच्या पाण्याचे पैसे देण्याची जबाबदारी घेतली आहे.

तर सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा यांनी या पाण्याचे जार नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिले आहेत. पालीत येणाऱ्या प्रत्येकाची तसेच विद्यार्थी, आदिवासी, महिला व वृद्ध यांची थंड पाण्याने तहान भागत आहे. जार मधील पाणी संपल्यास लगेच दुसरा जार उपलब्ध करून दिला जातो. पाण्याची कमतरता पडू दिली जात नाही. अट फक्त एवढीच की कोणी बाटलीत पाणी भरून न्यायचे नाही.

ग्रुपच्या सदस्यांनी येथील शिवाजी महाराज स्मारकाची साफसफाई, रंगरंगोटी व शुशोभिकरण करुन स्मारकाचा कायापालट केला अाहे. पालीतील मधल्या अाळीतील तलाव साफ करुन सुशोभिकरण केले आहे. पालीतील तलाव स्वच्छ व सुशोभित करणे, हटाळेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण, प्राथमिक अारोग्य समस्या मार्गी लावणे, स्वच्छता अादी विषय सध्या ग्रुपने हाती घेतले आहेत. तसेच शिवजयंती निमित्त आदिवासी वाड्यांवर कपडे तसेच गरीब महिलांना साड्यांचे वाटप केले आहे. धुळवडीला महा. अंनिसच्या साथीने आदिवासींना जवळपास अडीच हजार पूरण पोळ्यांचे वाटप केले आहे. अशा विविध सामाजिक विषयांवर व समस्यांवर ग्रुपचे कार्य सुरु आहे. अनेक सूज्ञ नागरिक विविध प्रकारे ग्रुपला सहकार्य करत आहेत.
 

Web Title: provides cold water on road