कोकणच्या विकासासाठी निधीची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

सावंतवाडी :  मला सर्वसामान्यांच्या संकल्पनेतला कोकणचा विकास करायचा आहे. आवश्‍यक असलेल्या निधीची मी तरतूद केली असून, माझ्या मंत्रिपदाचा उपयोग मी सर्वसामान्यांच्या विकासासाठी करेन, असा विश्‍वास पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज व्यक्त केला.

सावंतवाडी :  मला सर्वसामान्यांच्या संकल्पनेतला कोकणचा विकास करायचा आहे. आवश्‍यक असलेल्या निधीची मी तरतूद केली असून, माझ्या मंत्रिपदाचा उपयोग मी सर्वसामान्यांच्या विकासासाठी करेन, असा विश्‍वास पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज व्यक्त केला.

वाढदिवसानिमित्त सावंतवाडीकरांच्या वतीने आज श्री. केसरकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते; मात्र अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर ते येथे अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्ते आणि केसरकरप्रेमींनी लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, देवा टेमकर, प्रकाश परब, शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, जान्हवी सावंत, सागर नाणोसकर, रूपेश राऊळ, शर्वरी धारगळकर, साक्षी कुडतरकर आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर यांनी मोबाइलवरून उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रेमामुळे मी आमदार झालो आणि आज गृह राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ही जबाबदारी पेलताना मला यश येवो, असे आशीर्वाद माझ्या हितचिंतकांनी मला द्यावेत. मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी आज येण्याचा निर्णय घेतला होता; परंतु अहमदनगर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मला कार्यक्रम सोडून तेथे जावे लागले.‘‘

ते पुढे म्हणाले, ""मी माझ्या मंत्रिपदाचा उपयोग कोकणच्या विकासासाठी करणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या निधीची तरतूद मी केली आहे. माझ्या सर्व पाठीराख्यांना अभिनाम वाटेल असे काम मी निश्‍चितच करणार आहे. त्यासाठी मला सर्व चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.‘‘

श्री. साळगावकर म्हणाले, ""श्री. केसरकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मनमिळावू आणि प्रेमळ असलेले केसरकर हे प्रसंगी वज्राहून कठीण होतात, याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र त्यांना कोणी कितीही विरोध केला तरी ते त्याच्यावर रागावत नाहीत. आज ते मंत्रिपदापर्यंत पोचले, याचा आम्हाला अभिमान आहे; मात्र त्यांचे हे यश पाहण्यासाठी आज त्यांचे आई-वडील असणे गरजेचे होते. तेसुद्धा त्यांच्या यशामुळे भारावून गेले असते.‘‘

सौ. सावंत म्हणाल्या, ""आपुलकीने विचारपूस करणारा नेता म्हणून श्री. केसरकर यांनी ओळख आहे. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या या यशात आम्ही त्यांच्यासोबत आहोत.‘‘

आणि साळगावकरांनी साधला संवाद.....
श्री. केसरकर अनुपस्थित राहिल्याने नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला; मात्र सूत्रसंचालन करणाऱ्या उपनगराध्यक्ष पोकळे यांनी साळगावकर यांना डावलत केसरकर यांचा संवाद झाल्यानंतर सौ. सावंत यांना भाषणात आभार मानण्यास सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांत बसलेल्या कुडाळ येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी साळगावकर यांना बोलायला द्या, असे उभे राहून सांगितले. त्यानंतर साळगावकर उभे राहून बोलले. 

Web Title: Provision of funds for the development of Konkan

टॅग्स