बनावट स्वाक्षरी प्रकरणी कार्यवाही करण्याचे कोकण उपआयुक्तांचे आदेश 

अमित गवळे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर यांनी केला होता. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश कोकण उपायुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहेत.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर यांनी केला होता. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश कोकण उपायुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहेत.

संबंधित ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरीता गजानन वाडेकर (अपंग व्यक्ती, रा. करंजघर- विठ्ठलवाडी) यांनी आवाज उठविला आहे. ग्रामसेवकावरील कारवाईकरीता वाडेकर यांनी पाली पंचायत समितीसमोर उपोषण केले होते. याबाबत गजानन वाडेकर यांनी कोकण विभाग नवी मुंबई आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार उपआयुक्त गणेश चौधरी (कोकण विभाग नवी मुंबई) यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासीक सभेच्या इतिवृत्तात ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केली असल्याच्या गजानन वाडेकर यांच्या तक्रारीची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश उप आयुक्तांनी दिले आहेत. याप्रकरणी न्यायीक बाबी घडल्यास अथवा तक्रारदाराने पुन्हा उपोषण केल्यास सबंधीत प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असे पत्रात सूचीत केले आहे. 

या प्रकरणी सबंधीत ग्रामसेवकावर कारवाई होण्यासाठी गजानन वाडेकर पुन्हा 23 एप्रिलला पाली पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेल्या निवदेनात दिला आहे. 

काय आहे प्रकरण?
खवली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एस. व्ही. चौकर यांनी 24-03-2015 रोजीच्या मासिक सभेतील इतिवृत्तात तत्कालीन सरपंच सुलभा पवार यांची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर यांनी केला आहे. गजानन वाडेकर यांनी यापुर्वी 21 मार्च 2016 व 06-11-2017 तसेच 5 मार्च 2018 रोजी ग्रामसेवकावर कारवाई होण्याच्या मागणीच्या अनुषंगाने उपोषण केले. 

खवली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सुलभा गणपत पवार यांची खोटी स्वाक्षरी ग्रामसेवक सुरेश चौकर यांनी केली असल्याबद्दल गजानन वाडेकर यांच्या तक्रारी अर्जा प्रकरणी सदर स्वाक्षरीची सत्यता पडताळणी साठी मा. मुख्य शासकीय दस्तऐवज परीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग पाषाण पुणे यांच्याकडे कार्यालयाचे पत्र ०३-०३-२०१८ अन्वये सादर करण्यात आले आहे. त्यानुसार उपलब्द होणार्‍या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पाली सुधागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी सांगितले. 

Web Title: proxy sign order to take action