
नैराश्य गडद; पालकांच्या काळजाची धडधड वाढली
युवकांच्या डोक्यात "पबजी'ची नशा पाकिस्तान, बांग्लादेश, ओमान येथील युवक-युवतीही पबजी खेळण्यासाठी इथल्या युवक-युवतींना निमंत्रण देत आहेत.
कणकवली (सिंधुदुर्ग ) : "पबजी' या ऑनलाईन मोबाईलमधील गेमची मजा घेता घेता, थेट मेंदूचा ताबा घेणाऱ्या "पबजी' खेळाची नशा जिल्ह्यात महाविद्यालयातील युवकांमध्ये एवढी भिनली आहे, की नैराश्यच्या गर्तेत ही पिढी आत्मघाताकडे वळत आहे. गेमच्या आहारी गेलेल्या जिल्ह्यातील एका युवकाने नुकताच आत्मघाताचा प्रकार करून घेतल्याची घटना घडल्याने पालकांच्या काळजाची धडधड वाढली आहे.
शंभर खेळाडू एका बेटावर शस्त्रे वापरून एकमेकांशी लढाई खेळतात. यातील जो खेळाडू किंवा संघ शेवटपर्यंत टिकेल त्याला विजयी घोषित केले जाते. प्रत्यक्षात न मिळणारा विजय या आभासी स्वरूपातील खेळात मिळत असल्याने प्रामुख्याने 15 वर्षावरील मुले खेळाच्या व्यसनात अडकत चालली आहेत.
हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ?
विविध कंपन्यांचे डाटा पॅकदेखील स्वस्त असल्याने अनेक मुले दिवसरात्र या खेळामध्ये स्वतःला गुंतवून घेत आहेत. खेळाच्या व्यसनामुळे कॉलेजला दांडी, अभ्यासाकडे दुर्लक्ष, सतत होणारी चिडचिड आणि मानसिक संतुलन बिघडत जात असल्याने आत्महत्या करण्याचेही प्रकार होत आहेत. या प्रकारांमुळे पालकवर्ग पुरता हादरून गेला आहे.
वर्षभरापूर्वी ब्ल्यू व्हेल या गेमने धुमाकूळ घातला होता. या गेमवर बंदी आणल्यानंतर आता पबजी या गेमची भुरळ युवकांना पडली आहे. चार किंवा आठ जणांचा ग्रुप करूनही महाविद्यालयातील युवक या खेळाच्या व्यसनामध्ये अडकत आहेत. त्यासाठी आठवडा आठवडा विद्यालयांना दांडीदेखील मारली जात आहे. पालकांच्या कळत नकळत हा प्रकार सुरू असला तरी पाल्यावर नियंत्रण ठेवणे पालकांना कठीण होत चालले आहे.
हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा
पबजी गेममध्ये अकरावी आणि बारावीमधील मुलांचा सर्वाधिक ओढा राहिला आहे. आपापल्या कॉलेजमधील मुलांनी स्वतंत्र ग्रुप केले आहेत. याखेरीज पाकिस्तान, बांग्लादेश, ओमान येथील युवक-युवतीही पबजी खेळण्यासाठी इथल्या युवक-युवतींना निमंत्रण देत आहेत.
सुरवातीला साध्या स्वरूपातील पबजी खेळ नंतर पैसे भरून खेळला जातो. यात गेमध्ये मुले एवढी गुरफटातात की सलग दोन, तीन दिवस अन्नपाणी न घेता या खेळात गुंतून राहतात. अतिजागरणाने सैरभैर होतात. मालवण, कणकवलीच नव्हे तर इतर तालुक्यातही असे सैरभैर झालेल्या युवकांना घेऊन पालकांना मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घ्यावी लागत आह
प्रचंड हुशारी, रिस्क असणारा हा खेळ खूपच वेड लावणारा आहे. तसेच ग्रुपमध्ये खेळण्याची मजा काही औरच आहे.
- वैभव किंजवडेकर , विद्यार्थी.
पबजीच्या नशेतून विद्यार्थी आत्मघाताकडे वळू नयेत यासाठी सातत्याने जनजागृती करत आहोत. विद्यार्थी हे मोबाईलपेक्षा सांस्कृतिक, क्रीडा उपक्रमाकडे वळावेत, यासाठीही मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न सतत सुरू आहे.
- प्रा. आशिष नाईक, मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक
सिगारेट, दारू, गांजापेक्षा घातक पबजी गेमचे व्यसन आहे. सुरवातीला मोफत असलेला गेम नंतर पैसे देऊन खेळला जातो. मुलांचा मेंदूच हॅक होत असल्याने मुले सैरभर होतात. त्यामुळे युवक-युवतींनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा. प्रसंगी मोबाईल, इंटरनेटचा वापर पूर्णतः बंद करणेच हाच पबजी गेममध्ये अडकलेल्यांसाठी पर्याय आहे.
- डॉ. रुपेश धुरी, मानसोपचार तज्ज्ञ