कुडाळ तालुक्यात नुकसानीचे पंचनामे 

अजय सावंत
Sunday, 18 October 2020

आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार अमोल पाठक, येथील तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे यांच्या समवेत तालुक्‍यातील पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीच्या पंचनाम्याचा आढावा पावशी गावात घेतला.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आमदार वैभव नाईक यांच्या मागणीवरून कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार अमोल पाठक, येथील तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे यांच्या समवेत तालुक्‍यातील पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीच्या पंचनाम्याचा आढावा पावशी गावात घेतला. गावातील भातशेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. 

जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात शेती जमीनदोस्त झाली असून भाताला कोंब फुटले आहेत. याबाबत आमदार नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री भुसे यांची भेट घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार भुसे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. आमदार नाईक यांनी आज तहसीलदार पाठक यांच्या समवेत तालुक्‍यातील शेतीच्या पंचनाम्याचा आढावा घेतला. 

दरम्यान, नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांना संयुक्तरित्या पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार पाठक यांनी सांगितले. यावेळी सरपंच बाळा कोरगावकर, तलाठी अरसकर, कृषी सेवक सरंबळकर, शेतकरी बाबा तेली, सुदन तेली, राजेश शेलटे आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. 

726 हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण 
पावशी गावात भातशेतीची आमदारांनी पाहणी केली. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी यांना पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नजर अंदाजानुसार तालुक्‍यातील 1436 शेतकऱ्यांच्या 726 हेक्‍टर जमिनीवरील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे 5 ते 6 दिवसांत पूर्ण केले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी कृषी अधिकारी कांबळे यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punchnama of damaged agriculture in Kudal taluka started