esakal | सराफपेढीतील चोरीप्रकरणी पुण्यातील महिलेला अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

सराफपेढीतील चोरीप्रकरणी पुण्यातील महिलेला अटक 

कणकवली - शहरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधील चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे येथील एका संशयित महिलेस आज अटक केली. शामा रमेश भैसडे (वय 50) असे तिचे नाव आहे. ही चोरी 28 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. 

सराफपेढीतील चोरीप्रकरणी पुण्यातील महिलेला अटक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - शहरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधील चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे येथील एका संशयित महिलेस आज अटक केली. शामा रमेश भैसडे (वय 50) असे तिचे नाव आहे. ही चोरी 28 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - महामार्गालगत वामन हरी पेठे ज्वेलर्स दुकान आहे. तेथे 28 डिसेंबरला दोन महिला व एका पुरुष सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. तिघांनी दुकानातील काही सोन्याच्या वस्तू हाताळल्या आणि हातचलाखी करत तीन तोळ्यांची सोन्याची चेन लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.

त्यानंतर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हा अन्वेषणकडे तपास वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी फुटेजचे विश्‍लेषण करून संशयितांचा शोध सुरू केला. पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा येथे माहिती घेण्यात आली. याच दिवशी या महिलांनी रत्नागिरी बाजारपेठेतही असाच गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर संशयित भैसडे हिला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. तिला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला सात दिवसांची कोठडी दिली आहे. 

पोलिसांनी कोठडी मागताना चोरी केलेली चेन जप्त करायची आहे. तिच्या अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. तसेच संबधित महिलेने अन्य ठिकाणीही चोरी केली असल्याचे समोर येत असून त्याबाबत चौकशी करायची आहे अशी कारणे न्यायालयासमोर मांडली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील, उपनिरीक्षक रवीराज फडणीस, संकेत खाडये, रवी इंगळे, आशिष गंगावणे, प्रतीक्षा कोरगावकर यांनी केला आहे. 

अन्य चोऱ्याही उघड होणार 
कणकवलीसह सावंतवाडी, कुडाळ येथे सोन्याच्या दुकानातील हातचलाखीचे गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यात वरील संशयित महिलेचा सहभाग असल्याबाबत पोलिसांकडून चौकशी होत आहे. त्यामुळे अन्य गुन्हेही उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.  

 
 

loading image