चिपळूण बाजारपेठेत राडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

चिपळूण - शहरातील बाजारपेठेत दोन गटांत आज फिल्मी स्टाईलने राडा झाला. आलिशान चारचाकीतून आलेल्या चौघांनी एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलावून भर रस्त्यात मारहाण केली. हा प्रकार समजल्यानंतर जमावाने त्या चौघांची धुलाई करीत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. यात तीन जण जखमी झाले. दुपारी साडेबाराला हा प्रकार घडला. 

अमित अनंत शिर्के, राकेश चव्हाण, प्रवीण वासुदेव घुळे, किरण चव्हाण हे चौघे पांढऱ्या रंगाच्या गाडीतून (एमएच ११, एडब्ल्यू ८२१८) बाजारपेठेत आले. फळविक्रीचा व्यवसाय करणारे नयन पिसे यांना त्यांनी दुकानातून बाहेर बोलावले. नयन रस्त्यावर आल्यानंतर चौघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. नयन यांचे वडील शिवाजी पिसे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण झाली. त्यांच्या दुकानाची नासधूस करण्यात आली.

हा प्रकार समजल्यानंतर स्थानिक व काही व्यापारी पिसे यांच्या मदतीसाठी धावून आले. जमावाने पिसे यांना मारहाण करणाऱ्या चौघांचीही धुलाई केली. त्या चौघांकडे मारामारीसाठी वापरलेले प्लास्टिकचे रॉड सापडले. जमावाने काचा फोडून गाडीची नासधूस केली. पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमी अमित शिर्के, राकेश चव्हाण आणि वासुदेव घुळे यांना सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. किरण चव्हाण हा तेथून फरारी झाला. मारामारीसाठी वापरलेले रॉड आणि गाडी जप्त केल्यानंतर दोन्ही बाजूंचे लोक फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. 

दबावाला बळी न पडता कारवाई करा
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी सायंकाळी माहिती घेतली. अशा प्रकारचे कृत्य पुन्हा घडू नये म्हणून दबावाला बळी न पडता कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

Web Title: quarrel in Chiplun market