रायगड किल्ला पाहण्यासाठी आता 25 रुपये प्रवेश शुल्क

सुनील पाटकर
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून यापूर्वी 15 रुपये घेतले जात होते. आता हे शुल्क 25 रुपये झाले आहे. रायगड पाहण्यासाठी रोपवेने अथवा पायी पायऱ्यांनी जाण्याची सुविधा आहे. पायी तसेच रोपवेनेही जाणाऱ्यांना हे शुल्क द्यावे लागणार आहे.

महाड - केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ केल्याने आता रायगड किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींना 25 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांकडून 1 सप्टेंबर 1996 पासून प्रवेश शुल्क घेण्यास सुरवात केली. त्यासाठी जागतिक वारसा वास्तू आणि आदर्श स्मारक अशी वर्गवारी करण्यात आली.

रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून यापूर्वी 15 रुपये घेतले जात होते आता हे शुल्क 25 रुपये झाले आहे. रायगड पाहण्यासाठी रोपवेने अथवा पायी पायऱ्यांनी जाण्याची सुविधा आहे. पायी तसेच रोपवेनेही जाणाऱ्यांना हे शुल्क द्यावे लागणार आहे. अलिबागमधील कुलाबा किल्ला पाहण्याचे दरही वाढले आहेत. रायगडावर वाढलेल्या या शुल्कवाढीमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. रायगडावर सध्या कोणत्याही सुविधा नाहीत. त्या प्रथम पुरवाव्यात व नंतर वाढ करावी असे पुणे येथील पर्यटक शशिकांत देशपांडे यांनी सांगितले. 

पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एलिफंटा लेणी, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, कार्ला लेणी आणि भाजे लेणी औरंगाबाद येथील लेणी, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, कान्हेरी गुंफा इ. राज्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Raigad Fort Entrance Fee Is Twenty Rupees