शेतकरीहिताचे निर्णय घ्या; सुराज्य आणा - संभाजीराजे छत्रपती

संदीप खांडेकर
बुधवार, 7 जून 2017

रायगड - 'पुढाऱ्यांनो, रायगडाची माती माथ्यावर लागल्याशिवाय तुम्ही राजकारण करू शकत नाही. राजकारणातून तुम्हाला भले करायचेच असेल, तर शेतकऱ्यांचे करा. त्यांच्यासोबत राजकारण न करता सत्ताधारी व विरोधी पक्षाने शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे सुराज्य आणा,' असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. पुढच्या वर्षी शिवजयंती दिल्लीत साजरी करणार असून, त्यासाठी राष्ट्रपती व पंतप्रधानांना आमंत्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

समितीतर्फे झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सुवर्णनाण्यांचा अभिषेक झाला आणि राजदरबार "जय जिजाऊ, जय शिवराय' या घोषणेने दुमदुमून गेला. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत सोहळा साजरा झाला.

संभाजीराजे म्हणाले, 'शेतकऱ्यांची स्थिती आज हलाखीची आहे. पंधरा वर्षांत पन्नास हजार आत्महत्या झाल्या. त्यामुळे पुढाऱ्यांना एक विनंती आहे, की त्यांनी शेतकऱ्यांसमवेत राजकारण करू नये.

शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी चार हजार कोटी कर्ज काढणार असाल, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीही कर्ज काढले पाहिजे. मात्र कर्जमाफी अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच द्यायला हवी; अन्यथा आजपर्यंत किती मोठ्या बोक्‍यांनी कर्जमाफी लाटली आहे, हे आपण सर्व जणच जाणतो.''

या प्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजयकुमार शिवतारे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर आदी उपस्थित होते. यशवंत गोसावी, बालाजी गाडे व सुखदेव गिरी यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्हा परिषदेच्या शेडमधून छत्रपती शिवराय व जिजाऊ यांची पालखी मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू होताच, शिवभक्तांचे मोबाईल छायाचित्र टिपण्यासाठी सरसावले. होळीचा माळ, नगारखाना येथून राजसदरेवर पालखी पोचल्यानंतर राजसदरेत शिवछत्रपतींचा जयघोष सुरू झाला. संभाजीराजेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्णनाण्यांचा अभिषेक झाला. त्यानंतर पालख्या होळीच्या माळाकडे रवाना झाल्या.

शिवराज्याभिषेक सहा जूनलाच व्हावा...
शिवजयंती तीनदा साजरी होते. आता शिवराज्याभिषेकसुद्धा तीन वेळा साजरा होत आहे. माझा तिथीच्या राज्याभिषेकाला विरोध नाही. मात्र, शिवछत्रपतींचे कार्य जगभर पोचवण्यासाठी सहा जूनलाच राज्याभिषेक सोहळा होणे उचित ठरणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

Web Title: raigad konkan news decide on farming