रायगडाला नवा महादरवाजा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

ऐतिहासिक तटबंदीला जुन्या वैभवाची झळाळी   
महाड - बेलाग रायगडाच्या बुलंद तटबंदीचे नाक असलेला व शत्रूच्या नजरेला पुरता चकवा देणारा रायगडचा महादरवाजा काळाच्या ओघात लुप्त झाला होता.  केवळ दगडी कमानी, भिंती उरलेल्या या ठिकाणी आता पुरातत्त्व विभागाने नवा; पण ऐतिहासिक धाटणीचा सोळा फूट उंच व दहा फूट रुंदीचा सागवानी दरवाजा बसवला आहे. त्यामुळे रायगडावर पाऊल टाकताना शिवकाळाची नवी अनुभूती मिळत आहे!

ऐतिहासिक तटबंदीला जुन्या वैभवाची झळाळी   
महाड - बेलाग रायगडाच्या बुलंद तटबंदीचे नाक असलेला व शत्रूच्या नजरेला पुरता चकवा देणारा रायगडचा महादरवाजा काळाच्या ओघात लुप्त झाला होता.  केवळ दगडी कमानी, भिंती उरलेल्या या ठिकाणी आता पुरातत्त्व विभागाने नवा; पण ऐतिहासिक धाटणीचा सोळा फूट उंच व दहा फूट रुंदीचा सागवानी दरवाजा बसवला आहे. त्यामुळे रायगडावर पाऊल टाकताना शिवकाळाची नवी अनुभूती मिळत आहे!

हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीला जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणून महादरवाजाचा वापर होत असे. रायगडावरील मजबूत तटबंदीत बसवलेला हा महादरवाजा शत्रूच्या नजरेस सहजासहजी पडत नव्हता. दरवाजाच्या थेट पुढ्यात आल्याखेरीस त्यावर तोफांचा मारा करणे शक्‍य होणार नाही, अशी त्याची रचना आहे. 

औरंगाबाद येथील कारागीर दरबारसिंग होलीए आणि त्याच्या सहा सहकाऱ्यांनी पाच महिने अथक परिश्रम करून हा ऐतिहासिक दरवाजा तयार केला आहे. अखंड दरवाजा गडावर नेणे अवघड असल्याने सुटे भाग वर नेऊन ते बसवण्यात आले. दरवाजासाठी १२ लाख रुपये खर्च आला. शिवकालीन दरवाजाशी साम्य असणारे नक्षीकाम व इतर रचना केली आहे. त्यामुळे गडाचे ऐतिहासिक रूप खुलले आहे. हत्तीच्या बळालाही दाद देणार नाहीत, असे मजबूत खिळे त्या काळी दरवाजाला होते. तशाच पद्धतीचे खिळे या दरवाजाला लावण्यात आले आहेत. महादरवाजाला दिंडी दरवाजा (एक लहान दरवाजा) करण्यात आला आहे. त्यातूनच पर्यटकांना जा-ये करावी लागेल. पुरातत्त्व विभागाने आपल्या निकषानुसार व ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हा दरवाजा तयार केला आहे. त्यावर ऊन-पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे. 

सूर्यास्तानंतर निर्बंध? 

रायगडावरील दरवाजे सूर्योदयाला उघडून सूर्यास्ताला बंद केले जात असतात. दरवाजे बंद झाल्याने हिरकणीला बाळासाठी कडा उतरावा लागला होता. आता पर्यटकांना सूर्योदयानंतर महादरवाजातून प्रवेश व सूर्यास्तानंतर दरवाजा बंद केला जाणार की काय, अशी शंका आहे. विशेष म्हणजे याबाबत पुरातत्त्व विभाग विचार करीत आहे. या विभागाच्या नियमानुसार रायगडावरही अशा प्रकारे अंमलबजावणी होऊ शकेल. गडावरील इतर वास्तूंमध्येही सुधारणा केली जाणार आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक व्ही. एस. बडिगेर यांनी दिली.

Web Title: raigad new door