सुधागड तालुक्यातील यादव कुटूंबियांना टाकले वाळीत

sudhagad
sudhagad

पाली : वाळित प्रकरणांचा वाढता आलेख हि गोष्ट रायगड जिल्ह्यासाठी कलंक ठरत आहेत. सुधागड तालुक्यात चंदरगाव बौध्दवाडीतील नितीन यादव यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत पिडीत नितीन रमेश यादव यांनी पाली तहसिलदार बि.एन.निंबाळकर व पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्याकडे तक्रार निवेदन दिले आहे. योग्य न्याय न मिळाल्यास कुटूंबा समवेत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

सुधागड तालुक्यातील हे दुसरे वाळीत प्रकरण आहे.याअाधी गौळमाळ येथे एका कुटूंबास वाळीत टाकण्यात आले होते. नितीन यादव हे त्यांच्या कुटुंबासमवेत चंदरगाव बौध्दवाडीत राहत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संभाव्य उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत असल्याचा राग त्याच्यावर ठेवण्यात आला. अाणि गावकर्यांना एकत्रीत करुन यादव कुटुंबाशी बोलणे बंद करण्यात आले. यापुर्वी गावातील लोक व्यवस्थीतपणे बोलत होते असे नितीन यादव यांनी सांगितले. या बरोबरच वडील रमेश यादव यांना येता जाताना विनाकारण शिवीगाळ केली जात असून वाद निर्माण होईल अशी वर्तणूक केली जात आहे. 4 नोव्हेंबर रोजी गावात समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी घराघरातून वर्गणी काढण्यात आली होती. परंतू नितीन यादव यांच्या कुटुंबाकडून सदर वर्गणी घेतली नाही व कार्यक्रमास देखील निमंत्रीत केले नाही. 

दोन वर्षाच्या मुलीला लहान मुलांमध्ये खेळण्यास बंदी घातली असल्याने सर्वच कुटुंब तणावात आहे. अशा प्रकारच्या वागण्याचा कुटुंबातील सर्वच घटकांना मानसीक त्रास होत आहे. असे यादव यांनी अापल्या तक्रार निवेदनात नमुद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील लोकशाहीपध्दतीत प्रत्येकाला स्वतंत्रपणे मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार आमच्या कुटुंबियांनी मतदान केले असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार कायदा व ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा. व यादव कुटुंबाला लवकर योग्य न्याय द्यावा. अन्यथा याप्रकरणी संपुर्ण यादव कुटुंब पाली सुधागड तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या प्रकरणा मागची नेमकी वस्तुस्थिती व पार्श्वभुमी जाणून घेण्यासाठी प्रशासन स्तरावर काम सुरु आहे.पाली पोलीस स्टेशनला चंदरगावातील वस्तुनिष्ठ अहवाल उपलब्द करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पाली पोलीस स्टेशनकडून अहवाल प्राप्त होताच यावर सबंधितांची तातडीने बैठक आयोजीत करण्यात येणार आहे. कुटूंब बहिष्कृत करणे हा अतिषय संवेदनशिल प्रकार असल्याने अशा स्वरुपाची तक्रार गांर्भियाने घेतली आहे. प्रशासनाच्या मध्यस्थितीने यावर सामंजसपणाने व सामोपचाराने लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.
- बि. एन. निंबाळकर, तहसिलदार पाली सुधागड

वाळीत प्रकरणांना पायबंद घालण्यास पोलीस व शासन प्रशासन प्रयत्नशिल आहे. वाळीत प्रकरणांचे समुळ नष्ट करण्यासाठी गावागावात खेड्यापाड्यात प्रशासनस्तरावर प्रभावीरीत्या समाज प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. चंदरगाव येथील सामाजीक बहिष्कार प्रकरणाची तक्रार आली असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे. याबाबतची नेमकी वस्तुस्तीती जाणून घेवून यावर सामंजसपणे तोडगा काढला जाईल.
- दशरथ पाटील, पोलीस निरिक्षक पाली सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com