लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरेच - आमदार पंडित पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

म्हसळा - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार सुनील तटकरे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा अलिबाग मुरूडचे आमदार पंडित पाटील यांनी म्हसळा गोंडघर येथील शेकापच्या मेळाव्यात केली. तटकरे यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावाही त्यांनी केला.

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आघाडी करून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली आहे. जातीपातीचे राजकारण करून जनतेला फसविणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आगामी सर्वच निवडणुकांत शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

या वेळी पंडित पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे सदस्य आस्वाद पाटील यांच्या निधीतून मंजूर केलेल्या गोंडघर कुणबी समाज सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. 

म्हसळा तालुक्‍यात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य नसले, तरी कार्यकर्त्यांनी विकासकामांची चिंता करू नये. आघाडी धर्माचे पालन करून जिल्हा परिषदेमार्फत गावांचा विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. म्हसळा तालुक्‍यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीचे सदस्य निवडून आणण्यात शेकापच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. 

Web Title: Raigad News MP Pandit Patil comment