भाजपने अच्छे दिनाचे स्पप्न दाखवून जनतेची निराशा केली: तटकरे

अमित गवळे
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पक्षसंघटन वाढविण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर
तटकरे म्हणाले की तळागळातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या समस्या व प्रश्न समजून घेवून ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्या. सभासद नोंदणी कार्यालयात बसून न करता घरोघरी जावून करा. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करुन पक्षसंघटना मजबुत करा.

पाली : अच्छे दिनाचे स्वप्न दाखून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेची घोर निराशा केली. भाजप सरकार जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले अाहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. सुधागड तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार तटकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता.11) येथील भक्त निवास क्र. 1 येथे करण्यात अाला.यावेळी तटकरे बोलत होते.

सरकारच्या नोटबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी, शेत मालाला योग्य भाव, खात्यात पंधरा लाख रक्कम जमा करणे, तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. तटकरे पुढे म्हणाले, की देशात सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सत्तेची तीन वर्ष पुर्ण होवून देखील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होवू शकली नाही.भाजपच्या मागे शिवसेना फरफटत चालली आहे. सत्तेत असुनही विरोधकाची भुमिका शिवसेना घेतांना दिसते.शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकर्‍यांचा मालाला योग्य भाव व बोनस दिला. महिलांना आरक्षणाची तरतुद निर्माण केल्याने महिलांनी समाजकारण व राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.

तटकरे म्हणाले, की वसंत ओसवाल यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष संघटना मजबुतीसाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले. बहुजन समाजाला सोबत घेवून अविरत काम करण्यात ते यशस्वी ठरले. वसंत ओसवाल यांचा हा वारसा लाभलेल्या त्यांच्या कन्या गिता पालरेचा या सक्षमपणे पुढे चालवित आहेत. वसंत ओसवाल यांच्या 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवी सोहळ्यास शरद पवार उपस्थित राहणार हिच वसंत ओसवाल यांच्या आयुष्यातील खरी कमाई अाहे.

सुधागड तालुक्यात गिता पालरेचा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 14 ग्रामपंचायतीपैकी 8 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून येण्याची किमया घडली. बहुजन समाजाने गिता पालरेचा यांचे नेतृत्व स्विकारले आहे. मधल्या काळात अनेकजन पक्ष सोडून गेल्याने पक्षाची पिछेहाट होईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतू प्रतिकुल परिस्तितीला अनुकुल करण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले, असे ओसवाल म्हणाले. तर रा.कॉ.पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर म्हणाले कि वसंत ओसवाल यांनी शैक्षणिकदृष्ट्या उल्लेखनिय काम केले.गिता पालरेचा यांचे संघटनकौशल्य वाखाणण्याजोगे अाहे. सुनिल तटकरे यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. आजही सुनिल तटकरे हे जनू जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असा आदरभाव जनमाणसात आहेत. यावेळी कामथेकरवाडी व खांडपोली येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या म्हसळा तालुकाध्यक्षपदी फैजल गिते यांची नियुक्ती झाल्याचे पत्र आ. सुनिल तटकरे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.

या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, जिल्हा उपाध्यक्ष ग.रा.म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा,पाली-सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे,दादा कारखानिस, रा.कॉ. सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, राष्ट्रवादी काँग्रस सुधागड तालुका महिला अध्यक्ष सुजाता भोईर, माजी तालुकाध्यक्ष यशवंत पालवे,पाली शहर अध्यक्ष अभिजीत चांदोरकर, ललित ठोंबरे,सुशिल शिंदे, किरण खंडागळे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थीत होते.

विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार
यावेळी आ. सुनिल तटकरे यांच्या हस्ते खवली ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध सरपंचपदी निवडून आलेल्या रुचिता बेलोसे यांच्यासह विजयी सदस्य, तसेच साधूराम साजेकर सरपंच शिळोशी व सदस्य, माधवी पालवे सरपंच माणगाव खुर्द व सदस्य, अनिता साजेकर,चिवे सरपंच व सदस्य, दर्शना चव्हाण सरपंच चंदरगाव व सदस्य, पारु चौधरी सरपंच घोटवडे व सदस्य, कृष्णा वाघमारे सरपंच खांडपोली व सदस्य, उमेश यादव सरपंच सिध्देश्वर व सदस्य आदिंचा सत्कार करण्यात आला.

पक्षसंघटन वाढविण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर
तटकरे म्हणाले की तळागळातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या समस्या व प्रश्न समजून घेवून ते सोडविण्यासाठी पुढाकार घ्या. सभासद नोंदणी कार्यालयात बसून न करता घरोघरी जावून करा. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करुन पक्षसंघटना मजबुत करा.

Web Title: Raigad news NCP Sunil Tatkare criticize BJP