सरपंच निवडून येऊनही पराभूत घोषित..! मतमोजणीत घोळ

अमित गवळे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या गलथान कामाचा फटका

कमी मते मिळूनसुध्दा केवळ अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कामामुळे नथुराम वालेकर यांना सरपंचपदी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. विजयी असून सुध्दा कृष्णा वाघमारे यांना पराजित घोषीत करण्यात आले. सरपंचपदाची मते ही सदस्यांच्या नावे तर सदस्यांची मते ही सरपंचाच्या नावे लिहिल्याने हा तिढा निर्माण झाला आहे.

पाली (जिल्हा रायगड) : नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यावेळी सुधागड तालुक्यातील खांडपोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत मतमोजणीच्या घोळामुळे विजयी सरपंचाला पराजित घोषित करण्यात आले आहे. या संदर्भात पाली तहसील काऱ्यालयात मंगळवारी  (ता. २४) तहसीलदार बी. एन. निंबाळकर यांनी शिवसेना, शेकाप, राष्टवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अायोजित केली होती. यावेळी मतदान अधिकारांच्या हलगर्जीपणामुळे हा घोळ झाल्याचे समोर अाले अाहे.

खांडपोली ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत राष्टवादीच्या कृष्णा गणपत वाघमारे यांना अधिक मते मिळूनही मतमोजणीत अधिकाऱ्याकडून झालेल्या घोळामुळे शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार नथुराम चंद्रकांत वालेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. खांडपोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी वेळी मंगळवार (ता. १७)  निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. माने यांनी मतमोजणीचे काम पाहिले. यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील सरपंचपदाकरीता शिवसेनेकडून नथुराम चंद्रकांत वालेकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून कृष्णा गणपत वाघमारे यांनी निवडणूक लढविली. कृष्णा वाघमारे यांना 315 तर चंद्रकांत वालेकर यांना 76 मते पडली. याच वेळी सदस्यपदाच्या उमेदवार अर्चना गजानन आरेकर यांना 143 तर संजना संजय दिवेकर यांना 256 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे संजना दिवेकर यांची मते नथुराम वालेकर यांच्या नावाने टाकण्यात आली. तर अर्चना गजानन आरेकर यांची मते कृष्णा गणपत वाघमारे यांच्या नावावर टाकण्यात आली. परिणामी कमी मते मिळूनसुद्धा केवळ अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कामामुळे नथुराम वालेकर यांना सरपंचपदी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. विजयी असून सुद्धा कृष्णा वाघमारे यांना पराजित घोषित करण्यात आले. सरपंचपदाची मते ही सदस्यांच्या नावे तर सदस्यांची मते ही सरपंचाच्या नावे लिहिल्याने हा तिढा निर्माण झाला आहे.

यासंदर्भात सबंधित पक्षाच्या पदाधिकारी व उमेदवारांनी पाली तहसीलदार बी. एन. निंबाळकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी  (ता. २४)  या संदर्भात पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मतदानाचा हा घोळ समोर आला. परिणामी पक्षाच्या पदाधिकारी व उमेदवारांनी तहसील कार्यालयासमोर गोंधळ घातला.

निवडणूक खर्चाचा तपशील घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ही बाब उघड झाली. खांडपोली ग्रामपंचायतीच्या मतमोजनीचा प्रकार नजरचुकीमुळे झाला आहे. याबाबत पाली सुधागड तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करतील. त्यानंतर त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली जाईल. कोर्टात गेल्यास या संदर्भात फेर मतमोजणी होऊन सत्यता पडताळता येईल.
बी. एन. निंबाळकर, तहसीलदार, पाली-सुधागड

खांडपोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत आमच्याच पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला अाहे. केवळ मतदान अधिकाऱ्यांच्या गलथान कामकाजामुळे निवडून येवून हि पराजित घोषित केल्याने आम्ही आता न्यायालयीन लढाई लढणार आहोत. संबधित अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या मतमोजणीत सरपंच पदाची मते ही सदस्यांच्या नावे, तर सदस्यांची मते ही सरपंचाच्या नावे लिहिल्याने हा तिढा निर्माण झाला आहे.
- गीता पालरेचा, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या मतमोजणीच्या लेखी अाकडेवारी व निर्णयानुसार अामचे उमेदवार नथुराम वालेकर हेच विजयी आहेत.
रविंद्र देशमुख, जि. प. सदस्य

मतमोजणी अधिकारी तसेच सहायक यांनी दिलेल्या अाकडेवारी नुसारच मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयी उमेदवारांची तसेच सरपंचपदाच्या उमेदवारंची नावे व मते घोषित केली अाहेत.
- एन. डी. माने, निवडणूक निर्णय अधिकारी  (कृषी सहाय्यक)

Web Title: raigad news pali sarpanch gets more votes but declared loser