अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी 'तो' निघाला पायी भारत भ्रमणाला

अमित गवळे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

तेराशे किमी पेक्षा अधिक अंतर पायी चालून पूर्ण, मानवतेचा उदात्त हेतू

पाली (जिल्हा  रायगड) : रस्त्यावर जर तुम्हाला केस अाणि दाढी वाढलेला, पाठीवर मोठी बॅग अडकविलेला पायी चालणारा तरुण भेटला तर अचंबित होऊ नका! अन्नाची नासाडी थांबावी हा संदेश घेऊन मानवतेच्या उदात्त हेतूने हा तरुण भारतभ्रमण करत चक्क पायी चालत निघाला अाहे. अभियांत्रिकिचे शिक्षण पूर्ण केलेल्या या तरुणाचे नाव आहे निगीन बिनीश (वय.२४).अात्ता पर्यंत त्याने तेराशे किमी पेक्षा जास्त अंतर पायी चालत पार केले आहे. सकाळने मुंबई-गोवा महामार्गावर त्याच्या सोबत संवाद साधून खुप रंजक गोष्टी जाणुन घेतल्या.

मुंबई गोवा महामार्गावरुन जात असतांना तीन दिवसांपुर्वी सकाळी खांब गावाजवळ सुकेळी खिंडीच्या अलिकडे रस्त्याच्या अगदी कडेने एक मोठी बॅग घेऊन चाललेला तरुण दिसला. बॅगेवर काही तरी लिहिलेला कागद लटकतांना दिसला. उत्सुकता वाटल्याने गाडी वळवुन त्याच्या सोबत संवाद साधला. बॅगेला लटकलेल्या त्या लॅमिनेशन केलेल्या कागदावर इंग्लिशमध्ये लिहिले होते स्टाॅप वेस्टिंग फुड.. त्याची हिंदीची अगदीच अबाळ मग आमच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत संभाषण सुरु केले.मुळचा कन्याकुमारी येथील असलेला निगीन बिनीश हा २४ वर्षीय तरुण. वडील मासेमारी करतात. बिटेक पूर्ण करुन एमटेकची परिक्षा न देता अर्धवट सोडले. खिशात रुपया न घेता हा तरुण "अन्नाची नासाडी थांबावी" हा संदेश पसरविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी पायी चालत पूर्ण भारत भ्रमणासाठी निघाला आहे. २४ अाॅगस्टला तामिळनाडूतील कोइंबत्तूर येथून त्याने अापल्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे.दक्षिणेकडील राज्य पादाक्रांत करत तो गुजरात,राजस्थान, पंजाब व काश्मिरला जाऊन पुन्हा कोइंबत्तरला पोहचणार आहे. जवळपास वर्षभरात तो भारताच्या एका टोकापासून दुसर्या टोकाचे एवढे लांब अंतर पायी सर करणार आहे. हा प्रवास पूर्ण केल्यावर तो एक पुस्तक देखिल लिहिणार आहे. त्याला इंग्रजी, तामिळ व मल्ल्याळम या भाषा अवगत आहेत. महाराष्ट्रात पाऊल ठेवल्यावर तो अात थोडे थोडे हिंदी बोलू लागला आहे.भाषेची काही प्रमाणात अडचण जाणवत असल्याचे त्याने सकाळला सांगितले.

निगीन ने सकाळला सांगितले कि अापल्या देशात केवळ अन्न न मिळाल्याने वर्षाला जवळपास सात हजार लोक मरण पावतात. त्यामध्ये तीन हजार बालकांचा समावेश आहे. दोन कोटी लोक रात्री उपाशी पोटी झोपतात. तर वर्षाला अापण ६७ मिलीयन टन अन्न वाया घालवतो.म्हणजे हे अन्न वाचले तर तेवढ्यावर भुकेलेल्यांना पोटभर अन्न मिळू शकेल. पायी चालत हा संदेश तो लोकांपर्यंत पोहचवितो अाणि लोकांना एज्युकेट (शिक्षीत) करतो.अामच्या सोबत गप्पा मारुन मागे पलटून न बघता निगीन निघून गेला. मनाच्या कोपर्यात खुप काही अाशावाद ठेऊन...

अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी दोन मुख्य धोरणांचा वापर
त्याच्या जवळ पैसे नाहित. रोजच्या गरजेच्या थोड्याफार वस्तू मोबाईल व पाॅवर बँक घेऊन तो फिरतो. कोणी वाटेत फळ दिले तर ते कापण्यासाठी एक छोटी सुरी आहे.त्याने सांगितले कि अन्नाची नासाडी थांबावी हा संदेश देण्यासाठी तो प्रमुख दोन धोरण वापरतो. लोकांकडे जेवण किंवा अन्न-पाणी अाणि झोपण्यासाठी जागा मागतो. कोणाकडूनही पैसे घेत नाही किंवा मागत नाही.लोकांना सांगतो तो काय करतोय. मग ते त्याला मदत करतात. दुसरे धोरण म्हणजे शाळा, महाविदयालये,देवळे, चर्च अादी ठिकाणी मोफत व्याख्यान देतो. अशा प्रकारे त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचतो.

रात्री झोपण्याची सोय
रात्री झोपण्यासाठी लोकांकडे अासरा मागतो. काही लोक स्वतःहून घरी बोलवतात. अन्यथा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर, चर्च, मस्जिद, समुद्र किनारे अशा कुठल्याही ठिकाणी पाय पसरतो. एकदा तर चक्क पोलीस स्थानकात झोपला होता. मोकळ्या जागेवर झोपल्यास डास खूप त्रास देतात. अशा वेळी मग लवकर उठून प्रवासाला सुरुवात करतो. मात्र चांगल्या ठिकाणी झोपला असेल तर अधिक वेळ झोपणे पसंत करतो.

खाण्या-पिण्याची अबाळ
लोकांकडे अन्न मागतो. काही लोक अन्न देतात. कधी कधी एक वेळा खायला मिळते. तर कधी दोन किंवा तीन वेळेस खायला मिळते. एकदा तर पाच वेळा खायला मिळाले होते. ज्या दिवशी पोट भरलेले असते त्या दिवशी खुप चालतो. परंतू ज्या दिवशी पोट रिकामे असते त्या दिवशी मात्र तो अाराम करतो. त्याला कोणतेही अन्न अाणि पाणी चालते. त्याच्या सोबत बोलतांना माझे सहकारी दिलीप सोनावणे यांनी ब्रेकफास्ट करणार का विचारले अाणि अापल्या डब्यातील चपाती भाजी खायला दिली. निगीन ने ती मनसोक्त खाल्ली कारण रात्री त्याला जेवणच मिळाले नव्हते...

खडतर प्रवासात शरीराची साथ
इतके अंतर चालतांना दमायला होत नाही का? असे विचारल्यावर निगीन म्हणाला सुरवातीस चालतांना त्रास झाला. पाय व गुडघे दुखतात, पायांना व्रण येतात पण शरीराने अाता हे सर्व स्विकारले आहे. याची सवय झाली आहे. अात्ता पर्यंत अाठ किलो वजन कमी झाले आहे.

अनेक भले बुरे अनुभव
भारतात तुम्हाला तुमच्या राहणीमानावरुन,अॅपिअरन्सवरुन(जसे अाहात त्यावरुन) ओळखले जाते.माझी त्वचा काळी आहे. त्यात केस वाढलेले मग लोक मला चोर समजतात. एकदा तर टेरिरिस्ट समजले होते.अशा वेळी तेथून शांततेत निघून जाण्याचा मार्ग तो निवडतो. एकदा एक माणूस त्याला रागात खुप घाण शिव्या देत होता. त्याला त्याची भाषा समजत नव्हती.दोन चांगल्या माणसांनी मध्ये पडून निगीनला वाचविले अन्यथा त्या माणसाने त्याला मारले असते. पण मला कोणाचा राग येत नाही. सगळे अापलीच माणसे आहेत.असे तो म्हणाला

बहुतेक लोक सुरुवातीस माझा धर्म व जात विचारतात.परंतू मी कोणताच धर्म, जात व पंथ मानत नाही.माणसुकी अाणि मानवता हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे.खुप चांगले लोक मिळतात. सहकार्य करतात अापुलकी दाखवितात. त्यामुळे खुप समाधान मिळते.

गरुडाचे वाचविले प्राण
कर्नाटकमधून चालत असतांना वाहनाची धडक लागून जखमी झालेले एक गरुड भेटले. त्याचा पाय तुटला होता. त्याला सोबत घेऊन तो बाजुच्या गावात गेला. वन विभागाच्या अधिकार्यांना फोन केला त्यांनी गरुडावर उपचार केले.

प्रत्येकाकडून घेतो प्रेरणा
तुला या कार्यासाठी कोणी प्रेरित केले अाहे? असे विचारल्यावर निगीनने सांगितले की मला प्रत्येक माणसाकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात. मी त्या हेरून अात्मसात करतो.असे त्याने सांगितले.

बत्तीसशे किमीचा सायकल प्रवास
समुद्राच्या पाण्याची पातळी अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी त्याने जानेवारी महिन्यात बत्तीसशे किमीचा सायकल प्रवास केला होता. तामिळनाडू, केरळ अाणि पाँडेचरी हे ३२०० किमीचे अंतर त्याने सायकलने पार करुन जनजागृती केली होती.

Web Title: raigad news pali youth on foot india tour save food waste