सायन्स एक्सप्रेसचा रायगडला ठेंगा- विज्ञान प्रदर्शनाला मुकणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

अशी आहे सायन्स एक्सप्रेस
रेल्वेच्या आठ कोच मध्ये हे विविध प्रकारचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विज्ञानातील नव्या गोष्टींची ओळख,पाणी, शेती, जंगल, जैवविविधता, मानवी आरोग्य यांच्यावर हवामानातील बदलांचा होणारा परिणाम, वातावरण, ग्रीन हाऊस गॅस याविषयांची माहिती, भारताच्या शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीतील बदल, ऊर्जेचे महत्त्व, आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामान करार, पर्यावरणीय दुष्परिणाम रोखण्यासाठी शालेय पातळीवर, रस्त्यांवर, घर व कार्यालयांमध्ये आणि वैयक्तिक पातळीवरही काय सकारात्मक बदल करता येऊ शकतात याचे पर्याय या विषयी माहिती यात आहे.

महाड : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रचंड माहितीचा खजिना घेऊन येणारी सायन्स एक्सप्रेस रायगड जिल्ह्यात थांबणार नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक या सुवर्णसंधीला मुकणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणारा हा विज्ञानाचा रथ
जिल्ह्यातून धावणार असला तरी विज्ञान जगाची अनोखी सफर अनुभवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना रत्नागिरी व सिएसटि स्थानकावर जावे लागणार आहे. ही सायन्स एक्सप्रेस रायगड जिल्ह्यात थांबावी अशी पालकांची मागणी आहे.

क्लायमेट अॅक्शन स्पेशिअल(SECAS)' या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) पुढाकाराने 'सायन्स एक्सप्रेस विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रचंड माहितीचा खजिनवा घेउन देशातील विविध राज्यांमधून फिरत आहे. दिल्लीच्या सफरदजंग रेल्वे स्थानकावरून 17 फेब्रुवारीला सोडण्यात आलेली 'सायन्स एक्सप्रेस' 68 स्थानकांत थांबणार आहे .विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ही एक्सप्रेस उपयुक्त असून यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग तसेच विविध वैज्ञानिक साहित्य खरेदीही करता येणार आहे.रत्नागिरी स्थानकावर 14 ते 17 जुलै आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकावर ही एक्सप्रेस 19 ते 22 जुलै दरम्यान थांबणार आहे.

रेल्वेमध्ये असणारे हे प्रदर्शन विनामुल्य आहे परंतु रायगड जिल्ह्यात ही एक्सप्रेस थांबणार नसल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा,महाविद्यालये असुन या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेणे अवघड होणार आहे. रत्नागिरी व सीएसटी स्थानका दरम्यान रायग़डातील स्थानकात ही एक्सप्रेस थांबवावी यासाठी येथील काही पालकांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: raigad news science express no halt in raigad