रायगड : अखेर पालीकरांचे नगरपंचायतीचे स्वप्न होणार साकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड : अखेर पालीकरांचे नगरपंचायतीचे स्वप्न होणार साकार

रायगड : अखेर पालीकरांचे नगरपंचायतीचे स्वप्न होणार साकार

पाली (रायगड) : अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया विविध कारणांमुळे मागील पाच वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र पाली नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पाली नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना व सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.12) येथील भक्त निवास क्रमांक एक मध्ये संपन्न झाली. यावेळी 17 प्रारूप प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पाली नगरपंचायत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, तहसीलदार तथा प्रशासक दिलीप रायण्णावार, नायब तहसीलदार दिलीप कोष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, भाजप दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

प्रभाग क्रमांक 1 व 8 इतर मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 2, 7, 9, 11, 13 व 15 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक 4, 12 व 16 इतर मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 5, 6, 10 व 14 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे.

प्रभाग रचनेचे तीन मुख्य टप्पे राहणार आहेत:-

(अ) आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचना करणे,

(ब) हरकती व सूचनां वरील सुनावणी घेणे व

(क) अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे.

यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी शुक्रवार (ता.12) ते मंगळवार (ता.16) असणार आहे. या हरकती व सूचनांवर बुधवारी (ता.17) रायगड जिल्हाधिकारी सुनावणी देतील. गुरुवारी जिल्हाधिकारी (ता.18) हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविला जाईल. सोमवार (ता.22) पर्यंत संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील.

loading image
go to top