आवाज पाटलांचा!

प्रणय पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

रायगड जिल्‍हा परिषदेप्रमाणेच पंचायत समित्यांमध्येही पाटलांचा बोलबाला आहे...

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पाटलांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात पाटलांचाच आवाज घुमणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी १२ जागांवर पाटील आडनाव असलेले उमेदवार निवडून आले आहेत. यातील तीन पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पाटील आडनावाचे आठ उमेदवार निवडून आले होते. 

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी; तर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान; तर २३ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांपैकी १२ गटांत पाटील आडनाव असलेले उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये सहा महिला; तर सहा पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

अलिबाग व पेण तालुक्‍यात प्रत्येकी तीन जागांवर ‘पाटील’ विजयी झाले आहेत. पनवेल, खालापूर तालुक्‍यात प्रत्येकी दोन व रोहा, म्हसळा या तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी एका जागेवर पाटील आडनावाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

पंचायत्यांमध्येही आवाज
जिल्हा परिषदेसोबत जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांची निवडणूकही पार पडली. जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ११८ जागांपैकी १४ जागांवर पाटील आडनावाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पनवेल तालुक्‍यात सर्वात जास्त म्हणजे चार पाटील विजयी झाले आहेत. अलिबाग तालुक्‍यात तीन, खालापूर, पेण, उरण तालुक्‍यात प्रत्येकी दोन व मुरूड तालुक्‍यात एक पाटील विजयी झाला आहे.

पाटलांपाठोपाठ म्हात्रे 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाटील आडनावाच्या उमेदवारांच्या पाठोपाठ म्हात्रे आडनावाचे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत दोन; तर पंचायत समितीमधील नऊ पाटील विजयी झाले आहेत. पाटलांपाठोपाठ जिल्ह्यात म्हात्रेंचा आवाज बुलंद झाला आहे.

विजयी पाटील 
राजू पाटील (गुळसूंदे), रवींद्र पाटील (गव्हाण), पद्मा पाटील (वडगांव), नरेश पाटील (साजगाव), दत्तात्रेय पाटील (जिते), प्रमोद पाटील (दादर), नीलिमा पाटील (पाबळ), सुश्रुता पाटील (पाबळ), चित्रा पाटील (कुर्डूस), प्रियदर्शनी पाटील (चेंढरे), आस्वाद पाटील (खारगाव), धनश्री पाटील (पाभरे).

Web Title: raigad zp Patil