रेल्वे कारखान्यामुळे कोकण विकासाची पायाभरणी- प्रभू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

* डब्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन
* लोटे परशुराम येथे 50 एकर जागेत उभारणार
* देशभरातील रेल्वे गाड्यांची गरज भागवणार
* लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण

* डब्यांचे सुटे भाग बनविणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन
* लोटे परशुराम येथे 50 एकर जागेत उभारणार
* देशभरातील रेल्वे गाड्यांची गरज भागवणार
* लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण

लोटे : ""रेल्वे डब्यांसाठीचे सुटे भाग बनविणारा लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाना कोकणसाठी वरदान ठरेल. या कारखान्यामुळे कोकणच्या औद्योगिक विकासाच्या पायाभरणीला सुरवात झाली,'' असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले. असगणी-सात्विणगाव येथील विस्तारित क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या कारखान्यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कारखान्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

प्रभू म्हणाले, ""रेल्वेचा हा सर्वांत मोठा कारखाना आहे. त्यासाठी लोटे-परशुराम वसाहतीतील विस्तारित क्षेत्रातील पन्नास एकर जमिनीची गरज लागणार आहे. 297.28 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काही हजार हातांना रोजगार मिळणार आहे. या कारखान्यातून मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे कार्पोरेशन, पश्‍चिम रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे व दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या गरजा पुरविल्या जाणार आहेत. कारखान्यामुळे औद्योगिकीकरणाला गती मिळणार आहे. कारखान्यासाठी लागणाऱ्या लहान-मोठ्या वस्तू लघुउद्योजकांकडून घेण्यात येणार असल्याने परिसरात लहान-मोठे लघुउद्योग उभे राहणार आहेत.''

ते म्हणाले, ""भारतीय रेल्वेने 1 लाख 21 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. 56 हजार कोटींचे प्रकल्प मुंबईत आहेत आणि लवकरच पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही रेल्वेच्या सुट्या भागांची निर्मिती करणारे कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. सर्व जुन्या कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कोणतीही खरेदी पारदर्शक पद्धतीने करणार असून अशी पारदर्शकता खासगी कंपन्यांमध्ये यायला हवी, अशी मागणी आता काही कंपन्यांचे भागधारक कंपन्यांकडे करू लागले आहेत. रेल्वेमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने लागेल तेवढा खर्च करा, अशी परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पुढे धावणारे इंजिन सर्वांनाच दिसते; मात्र इंजिनला पुढे नेण्यासाठी मदत करणारे; पण न दिसणारे मागचे इंजिन हे देशाचे पंतप्रधान मोदीच आहेत.''
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी स्थानिक जनता आंदोलन करणार होती; मात्र आपण त्यांची समजूत काढली, असे भाषणात सांगितले होते. त्याचा संदर्भ घेत श्री. प्रभू यांनी सुनावले, की विरोध करण्याची ही वेळ नाही. आता नाही तर विकास कधीही नाही. कारखान्यामध्ये वशिलेबाजी चालणार नाही. पारदर्शकता असल्याने माझा मुलगाही मी या कारखान्यामध्ये वशिल्याने कामाला ठेवू शकणार नाही. गुणवत्तेनुसारच कामगार घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बचत गट कोकण रेल्वेशी जोडणार
श्री. प्रभू म्हणाले, ""माझ्या पत्नीने एक लाख महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवले. बचत गटातील या महिला आता कोकण रेल्वेत ई-कॅटरिंगद्वारे रेल्वेशी जोडल्या जाणार आहेत. अर्थात, या ई-कॅटरिंगमध्ये उच्च तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.''

Web Title: rail factory is foundation of industrial development of konkan