जलसंधारणासाठी भर पावसात गाळला पाचाड चिलेवाडीकरांनी घाम 

नागेश पाटील
सोमवार, 15 जुलै 2019

चिपळूण - तालुक्‍यात दरवर्षी कितीही पाणीटंचाई जाणवली तरी ती रोखण्यासाठी लोकसहभागातून हालचाली होत नाहीत. शासनानेच सर्व करण्याची मागणी होते. मात्र तालुक्‍यातील पाचाड चिलेवाडी येथील चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थांनी यास छेद दिला. सलग तिसऱ्या वर्षी चिलेवाडीतील डोंगरात पाणी अडविण्यासाठी सीसीटीची खोदाई केली

चिपळूण - तालुक्‍यात दरवर्षी कितीही पाणीटंचाई जाणवली तरी ती रोखण्यासाठी लोकसहभागातून हालचाली होत नाहीत. शासनानेच सर्व करण्याची मागणी होते. मात्र तालुक्‍यातील पाचाड चिलेवाडी येथील चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थांनी यास छेद दिला. सलग तिसऱ्या वर्षी चिलेवाडीतील डोंगरात पाणी अडविण्यासाठी सीसीटीची खोदाई केली. आज तर संपूर्ण चाकरमानी आणि वाडीतील सर्व कुटुंबीयांनी डोंगरात सुमारे चार एकरावर सीसीटी खोदाईसाठी श्रमदान केले. 

पाचाड चिलेवाडीतील चाकरमानी तरुणांनी तीन वर्षांपूर्वी वाडीतील पाणीटंचाईवर मात करण्याचा विडा उचलला. सुटीचे दिवस श्रमदानासाठी घालवले. डोंगरात दहा बाय दहाचे खड्डे आणि सीसीटी चर खोदून पावसाचे लाखो लिटर पाणी जिरवले. परिणामी पहिल्याच वर्षी कोरड्या विहिरींना पाणी मिळाले. दुसऱ्या वर्षीही मे महिन्यात चाकरमानी आणि स्थानिकांनी सीसीटी चर खोदण्यासाठी श्रमदान केले.

परिसरातील सर्व डोंगरात पाणी अडवण्याचे ध्येय ठेवले आहे. वर्षभरात ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खोदण्याचा त्रास कमी करण्यासाठी या वर्षी पावसाळ्यातच खड्डे खोदले. 30 ते 35 चाकरमानी तरुणांनी रजा घेत गाव गाठले. सुमारे 70 लोक या श्रमदानात सहभागी झाले होते. पाच ते सहा जणांचा गट करून काम सुरू होते. चिलेवाडी आणि परिसरातील विहिरींना आणि शेतींना पाणी मिळावे, यासाठी वाडीची मेहनत सुरू आहे. चिलेवाडी परिसरातील सर्वच डोंगरात सीसीटी चर खोदण्यात येणार आहेत. यापूर्वी काढलेल्या खड्ड्यात साचलेला गाळ पुन्हा काढला.

दुपारचे जेवण कामाच्या ठिकाणीच 
आज सकाळपासून स्थानिक व चाकरमान्यांनी डोंगरात दहा फूट लांब आणि दोन ते अडीच फूट खोलीचे चर खणले. भर पावसात श्रमदान सुरू होते. डोंगरात पाणी जिरवल्याने गावातील विहिरींची पाणी पातळी मे महिन्यात देखील वाढलेलीच होती. गावची पाणी योजनाही नियमित सुरू राहिली. आज सुमारे 2 एकरात सीसीटीचे चर खोदण्यात आले. आबालवृद्ध श्रमदानात सहभागी झाले. होते. दुपारचे जेवण सामूहिक कामाच्या ठिकाणीच केले. 

चिलेवाडीतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वतःच पुढाकार घेण्याचा निर्णय चाकरमानी तरुणांनी घेतला. सुटीत श्रमदान करून जलसंधारणाची कामे केली. तिसऱ्या वर्षीही ही कामे सुरू आहेत. सर्व ग्रामस्थ, चाकरमानी सहभागी झाल्याने कामाची गती वाढली. शेती व पिण्याच्या पाण्यात गाव समृद्ध व्हावे. यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. 
- रोशन चिले,
चाकरमानी तरुण 

चिलेवाडीतील डोंगरात सीसीटी चर खड्ड्यातून पावसाचे पाणी अडवून ते जिरवल्याने पाणीटंचाईवर मात होण्यास मदत झाली. वाडीतील सर्व विहिरींना उन्हाळ्यातही मुबलक पाणी असते. जलसंधारणाची ही चळवळ तालुक्‍यात पसरावी यासाठी चिलेवाडीचा हा पायलट प्रोजेक्‍ट आम्ही राबवीत आहोत. 
- राकेश चिले,
चाकरमानी तरुण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainwater harvesting for water conservation in Pachad Chilewadi