राणेंनी खासदारकी सोडावी; मगच टीका करावी - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

राणेंचा एक मुलगा कॉंग्रेसमध्ये, दुसरा स्वाभिमानमध्ये आणि स्वतः भाजपमध्ये अशा स्थितीत काम करणाऱ्या राणेंना इतरांवर टीका करण्याचा अधिकार नाही. भाजपवर टीका करायची असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. नंतरच अच्छे दिनबाबत त्यांनी प्रश्‍न विचारावेत.

- राजन तेली

कणकवली - भाजपमुळेच खासदार झालेल्या नारायण राणेंनी विश्‍वासयात्रा काढून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सुरू केलंय. त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, नंतरच भाजपच्या सरकारवर टीका करावी, असा टोला भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी लगावला. 

नारायण राणेंकडे 14 वर्षे पालकमंत्रीपद होते; पण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विकासाचा एकतरी प्रकल्प मार्गी लावला का? उलट वनसंज्ञा आणून जिल्ह्याच्या विकासात खोडा घातला. या उलट भाजप सरकारच्या काळात चौपदरीकरण मार्गी लागले. रेल्वे दुपदरीकरण, विद्युतीकरणाची कार्यवाही सुरू झाली असेही तेली म्हणाले. 

राणेंचा एक मुलगा कॉंग्रेसमध्ये, दुसरा स्वाभिमानमध्ये आणि स्वतः भाजपमध्ये अशा स्थितीत काम करणाऱ्या राणेंना इतरांवर टीका करण्याचा अधिकार नाही. भाजपवर टीका करायची असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. नंतरच अच्छे दिनबाबत त्यांनी प्रश्‍न विचारावेत.

- राजन तेली

ते म्हणाले, ""जिल्ह्यातील विकास प्रकल्प भाजपने बंद केल्याचा आरोप राणे करीत आहेत; पण त्यांनी आधी किती प्रकल्प सिंधुदुर्गात आणले याचीही माहिती द्यायला हवी. वस्तुत: राणे पालकमंत्री असतानाच जिल्ह्यात वनसंज्ञा लागू झाली. यात नरडवे, टाळंबा, शिरशिंगे, सरंबळ आदी पाटबंधारे प्रकल्पांच्या किमती वाढल्या. त्याचा मोठा परिणाम विकासावर आणि पाटबंधारे प्रकल्पांवर झाला आहे. राणेंनी बंदरमंत्री असताना रेडी पोर्ट खासगी कंपनीला चालवायला दिली. या कंपनीने विकासाची एकही नवी वीट रेडी पोर्टमध्ये लावली नाही.''  
 

भाजपमुळे खासदार झालेल्या राणेंना सरकारच्या धोरणांबाबत खटकत असेल तर त्यांनी राज्यसभेत आवाज उठवावा. विश्‍वासयात्रा काढून रस्त्यावर का फिरत आहेत. त्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे विचार आणि धोरणे पटत नसतील तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. 
- राजन तेली
, भाजप प्रदेश चिटणीस 

Web Title: Rajan Teli comment