'दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये'

'दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये'

सावंतवाडी - आंबोली येथील कबुलायतदार गावकरप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तालुकाध्यक्ष महेश सारंग, महेश धुरी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘केसरकर केवळ श्रेयवादाचे काम करीत आहेत. विमानतळाच्या उद्‌घाटनातही हे दिसले. आंबोली कबुलायदार गावकर प्रश्‍न हा तब्बल दहा वर्षे रखडला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही त्याबद्दल काही धोरण शासनाकडून जाहीर झालेले नव्हते. ही जमीन संबंधित शेतकऱ्यांची आहे, ती त्यांना मिळणे गरजेचे होते. असे असताना मागच्या अनेक वर्षांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काही केले नाही.

दीड वर्षापूर्वी भाजपकडून हा प्रश्न हाताळण्यात आला. त्यासाठी तब्बल मंत्रालय, जिल्हास्तरावर अनेक बैठका घेण्यात तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु या सर्व परिस्थितीत काही झाले नाही; मात्र भाजपचे ज्येष्ठ तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आवश्‍यक निर्णय घेतले.

दरम्यानच्या काळात ही जागा सरकारी नव्हती हे मान्य झाले आणि आता हा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे; परंतु पालकमंत्री केसरकर यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी घाईगडबडीत हा प्रश्‍न आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे.’’

राऊतांना नाही, तर केसरकरांना कंटाळले
तेली म्हणाले, ‘‘भाजपच्या मंडळीचा राऊतांना कोणताही विरोध नाही; परंतु पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या एककल्ली धोरणाला ते कंटाळले आहेत. त्यामुळे ते विरोध करत आहेत. त्यामुळे केवळ श्रेयासाठी झटणाऱ्या केसरकरांनी यापुढे भाजपची मदत हवी की नको याचे उत्तर द्यावे.’’


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com