राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली

राजेश सरकारे | Monday, 2 November 2020

तेली म्हणाले, ""दीपक केसरकर 8 महिने गायब असलेले आमदार आहेत. लोक भयभीत असताना अचानक काल आले. राणेंवर खालच्या शब्दात टीका करत शिवसेनाप्रमुखांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

कणकवली (सिंधुदुर्ग) - दीपक केसरकर कसले कोकणचे नेते, ते सावंतवाडी शहरापुरते मर्यादित होते. राणेंमुळेच केसरकर नगराध्यक्ष व आमदार झालेत याचा मी साक्षीदार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री पद दिले. तुम्ही राज्यमंत्री होता, तेही शिवसेनेने काढून घेतले. कारण तुमच्यावर विश्‍वास राहिला नाही. केसरकर फक्त जिल्ह्यात येऊन राणेंवर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली. 

येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. तेली म्हणाले, ""दीपक केसरकर 8 महिने गायब असलेले आमदार आहेत. लोक भयभीत असताना अचानक काल आले. राणेंवर खालच्या शब्दात टीका करत शिवसेनाप्रमुखांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये सुध्दा त्यांनी अशीच सहानभूती मिळाली होती. राष्ट्रवादी व राणेंवर टीका करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली. दीपक केसरकर यांना नगरपंचायत मध्ये प्रवेश नव्हता तेव्हा नगराध्यक्ष निवडणुकीत राणेंनी 3 नगरसेवक देत पहिले नगराध्यक्ष केले. पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत केसरकर पराभूत होतील असा पोलीस रिपोर्ट होता. शरद पवार यांनी श्री. राणे यांना विचारुन केसरकर यांना उमेदवारी दिली होती.त ेव्हा शेवटच्या सर्व प्रचार सभा नारायण राणे यांनी सावंतवाडीत केल्या. त्यावेळी दीपक केसरकर यांना निवडून आणले. या सर्व घटना आठवून त्यांनी जनाची नाय तर मनाची तरी लाज बाळगुण बोलावे.'' 
 
...तर चित्र वेगळे 
श्री. तेली म्हणाले, ""निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांचे फोटो लावल्यामुळे केसरकर निवडून आलेत. शिवसेनेने कणकवलीत गद्दारी केली आणि नितेश राणे यांच्यासमोर उमेदवार उभा केला. केसरकर यांनी भाजपाचे आभार मानले पाहिजेत. सावंतवाडी, कुडाळमध्ये भाजपचा उमेदवार कमळ निशाणीवर दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते.'' 

संपादन - राहुल पाटील