एकरी हवेत 80 लाख ते सव्वा कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

जमिनीच्या मोबदल्यासंबंधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. सद्यःस्थितीमध्ये 2200 एकरांची मालकी असलेल्या शेतकऱ्यांनी संमतिपत्रे दिली आहेत.
- अभय करंगुटकर, प्रांत, राजापूर

राजापूर - 'ग्रीन रिफायनरी'साठी संपादित होणाऱ्या जमिनीचा दणदणीत मोबदला मिळाला; तर दोन हजार एकरांहून अधिक जमीन देण्यास ग्रामस्थ तयार आहेत. तशी संमतिपत्रे प्रशासनाला जमीनमालकांनी दिली आहेत. प्रश्‍न फक्त मोबदल्याच्या दराचा आहे. एकरी 80 लाख ते सव्वा कोटी रुपये मोबदला जमीनमालकांना हवा आहे.

तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार योग्य मोबदला दिला, तर जमिनी देण्याची तयारी असल्याची संमतिपत्रे देण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.

तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून ठाम विरोध केला जात आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून लोकांनी या प्रकल्प उभारणीला असलेला विरोध वेळोवेळी दाखवून दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. या साऱ्या घडामोडींमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शासनाकडून किती दराने मोबदला आवश्‍यक आहे, याची विचारणा केली होती. त्याबाबत संमतिपत्रे सक्षम प्राधिकार अधिकारी यांसह उपविभागीय अधिकारी किंवा गावचे तलाठी यांच्याकडे देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रकल्पग्रस्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

तीन गावांतून शून्य प्रतिसाद
जमिनीच्या मोबदल्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला पाळेकरवाडी, सागवे, कारिवणे येथील शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसला; तरी गोठीवरे, तारळ, उपळे, कार्शिंगेवाडी येथून चांगला प्रतिसाद आहे. पडवे, साखर, विल्ये, दत्तवाडी या गावांमधून अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: rajapur konkan news 80 lakh to 1.25 crore in one acer