'ग्रीन रिफायनरी'मुळे जमिनीली तिप्पट भाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले; मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी जमिनी दलालांना विकू नयेत.
- प्रथमेश घाडी, भूधारक, नाणार (ता. राजापूर)

राजापूर - नाणार (ता. राजापूर) येथे उभारल्या जाणाऱ्या "ग्रीन रिफायनरी' प्रकल्पात भविष्यांमध्ये दहा हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार, असे सांगितले जाते. तो मिळेल तेव्हा मिळेल मात्र, सध्या प्रकल्प परिसरातील जमिनीच्या खरेदी-विक्रीला जोर आला आहे. इस्टेट एजंटांचे खिसे भरले जात आहेत. रोजगाराचा हा वेगळाच मार्ग उपलब्ध झाला आहे.

रिफायनरी प्रकल्प परिसरामध्ये जमीन खरेदी-विक्रीतून काही लाखांची उलाढाल दररोज सुरू असते. त्यामुळे आता लॅंड माफियांचाही प्रवेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अडीच ते तीन लाख एकरी होणारे व्यवहार सध्या साडेसात ते आठ लाखांच्या घरात गेले आहेत. कमिशनमुळे दलालांचा सुळसुळाट झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या भागामध्ये मोठ्याप्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत.

कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी भागातील लोकांकडून या भागातील जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेऊन लोक इच्छुक आहेत. काही भागामध्ये स्थानिकांच्या साथीने परगावातील एजंट तळ ठोकून आहेत.

Web Title: rajapur konkan news land rate increase by green refinery