खोंडकिड्याच्या तडाख्याने आंबा बागायतदार त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

राजापूर - तालुक्‍यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आंबा कलमांची लागवड धोक्‍यात आली आहे. आंबा कलमांना सध्या खोंडकिड्याने पोखरले असून, तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये शेकडो झाडे मरण्याची भीती आहे.

राजापूर - तालुक्‍यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आंबा कलमांची लागवड धोक्‍यात आली आहे. आंबा कलमांना सध्या खोंडकिड्याने पोखरले असून, तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये शेकडो झाडे मरण्याची भीती आहे.

विविध फलोत्पादन योजनांचा लाभ घेत येथील शेतकऱ्यांनी प्रामुख्याने आंबा व काजू लागवड केली आहे. आधीच प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. खोंडकिड्याच्या संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावला आहे. पावसापासून खोंडकिड्याची लागण झाल्यामुळे झाडांच्या फांद्या मरू लागल्या आहेत. हातिवले, नाणार, कुंभवडे, तुळसवडे, आडवली, पाचल अशा 20 ते 25 गावांमध्ये झाडांना किडीचा तडाखा बसला आहे. झाडांना हळूहळू झिजवत नेणारा खोंडकिडा वर्षभर या झाडावर असतो. मात्र, पावसाळ्यामध्ये तो अधिक क्रियाशील होतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खोंडकिड्याचा झाडांवर जास्त प्रभाव दिसून येत आहे, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. खोंडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये आंबा उत्पादनासह उत्पन्नामध्ये अधिक घट होईल, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून आंबा कलमांवर खोंडकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमाण जास्त आहे. औषधांची फवारणी करूनही त्याच्यावर फारसा परिणाम झाला नाही.
- राजू आडिवरेकर, शेतकरी

Web Title: rajapur konkan news Mango botanist with strokes is stricken