सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

फुलपाखराच्या जीवनप्रवासातील विविध टप्पे आणि बदलांचे टिपण ठेवणे, त्या फुलपाखराला प्रत्यक्षात नैसर्गिक अधिवासाचा अनुभव देणे यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. वेळप्रसंगी तारेवरची कसरतही करावी लागली. फुलपाखराचा जीवनप्रवास प्रत्यक्षात अनुभवता आला याचे समाधान आहे.
- धनंजय मराठे, पक्षीमित्र

राजापूर -पुस्तकी किंवा ऐकीव ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष घेतलेले ज्ञान आणि त्यातून मिळालेला अनुभव उपयुक्त ठरतो. याचा अनुभव शहरातील पक्षीमित्र धनंजय मराठे यांनी घेतला. रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडलेले मूनमॉथ (पतंग) त्यांनी घरी आणले. अंडी घालण्यापासून अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीचे सुरवंटात झालेले रूपांतर आणि त्यानंतर सुरवंटाचे रंगीबेरंगी पंखाचे फुलपाखरू हवेत झेपावले असा सुमारे चाळीस दिवसांचा जीवनप्रवास त्यांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.

झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूला पतंग सुमारे तीनशे अंडी घालतात. त्यातून सुमारे दोनशे अळ्या बाहेर पडताना त्यापैकी शेवटी २०-२५ कोष तयार होतात. अंडी घातल्यानंतर ८ ते १५ दिवसांमध्ये त्यातून अळ्या बाहेर पडतात. पाने खाऊन अळ्या मोठ्या होतात. त्यानंतर संपूर्ण दिवस सुस्त राहून झाडाची पाने एकमेकांना चिकटवून त्यामध्ये कोष बांधतात. त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये पूर्णपणे वाढ झालेले फुलपाखरू तयार होते. कोषातून बाहेर पडल्यानंतर सुमारे तीन तासांमध्ये फुलपाखराची पूर्णपणे वाढ होते. अंड्यातून बाहेर आलेली अळी सर्वसाधारण तीन मिमी असते. पूर्ण वाढ झालेली अळी ३ ते ४.५ इंच लांबीची असते. पूर्ण वाढ झालेल्या पतंगाचे त्यानंतरचे जीवन  सुमारे पंधरा दिवसांचे असते, असे निरीक्षणाअंती मराठेंनी सांगितले.

ही संधी पक्षीमित्र मराठे यांना रस्त्यामध्ये सापडलेल्या मूनमॉथमुळे मिळाली. रस्त्यावर सापडलेले मूनमॉथ निशाचार असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याच्या विचारात ते होते. मात्र, घरी आणल्यानंतर काही तासामध्ये मूनमॉथने अंडी घातली आणि त्याचा जीवनप्रवास सुरू झाला. अंड्यापासून अळी ते फुलपाखरू असा तब्बल सुमारे चाळीस दिवसांचा मूनमॉथचा जीवनप्रवास असतो. त्यामुळे घरामध्ये नैसर्गिक अधिवासाचा अनुभव घेत असलेल्या मूनमॉथच्या अळीच्या जीवनामध्ये रोज होणारे बदल धनंजय मराठे यांनी टिपले. त्यांनी सांगितले की, अंडी, अळी, कोष  आणि त्यानंतर कोषातून बाहेर पडल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराने पंख फैलावून जीवनातील पहिली घेतलेली झेप रोमांचक होती. 

Web Title: rajapur news Butterfly

टॅग्स