‘संतुलित’मध्ये दिव्याखाली अंधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

दृष्टिक्षेप
राजापूर तालुक्‍यातील १७७ ग्रामपंचायती
जिल्हा परिषदेकडे निधी केला वर्ग
५३१ सौरपथदीप बसवायचे होते
इतर विकासकामांना फटका

राजापूर - शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी सौरपथदीप मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधी जमा केला होता. मात्र सुमारे चार वर्षाचा कालावधी लोटला, तरी अद्यापही संबंधित ग्रामपंचायतींना सौरपथदीप मिळालेले नाहीत. तालुक्‍याच्या आमसभेत हा विषय गाजला. त्यावेळी दीप तत्काळ मिळाले नाहीत, तर ग्रामपंचायतींना व्याजासह रक्कम परत करावी, असा इशारा देण्यात आला.

आमसभेने इशारा देऊन दोन महिने लोटले, तरी अद्यापही जिल्हा परिषदेकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी ही बाब आता थेट शासन दरबारी नेण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्ध योजनेमधून सौरपथदीप खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

पात्र ग्रामपंचायतीनी १३ व्या वित्त आयोगातून अथवा ग्रामपंचायत निधीतून ११ हजार ५०० रुपये जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यामध्ये वर्ग करावयाचे होते. त्यानुसार सुमारे चार वर्षांपूर्वी तालुक्‍यातील १७७ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार आपल्या हिस्स्याची रक्कम वर्ग केली. 

एकूण ५३१ सौरपथदीप बसविण्याचे निश्‍चित झाले होते. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीचा हिस्सा ३४ हजार ५०० रुपये होता. तो भरणा करण्यात आला. 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे मिळून सुमारे ६१ लाख ६५ हजार, तर शासनाचे सुमारे ४७ लाख ७९ हजार रुपये असे सुमारे १ कोटी ८ लाख ८५ हजार रुपये रक्‍कम जमा करण्यात आली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सौरपथदीप बसविण्यात आले. उर्वरित वाटच बघत आहेत.

गावच्या विकासकामांना फटका
एक हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींकडे जमा होणारा ग्रामपंचायत निधी अल्प असतो. त्यामुळे गावात विकासकामे करताना मर्यादा येतात. अशा स्थितीतही काही शासकीय योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या निधीतून विकासकामे करतात; मात्र शासनानेच ग्रामपंचायतीना तेराव्या वित्त आयोग व ग्रामपंचायत फंडातून दिव्यांसाठी निधी वर्ग करण्याचे आदेश दिल्याने इतर विकासकामांना फटका बसला.

सौरपथदीपांसाठी आवश्‍यक असलेला निधी जमा करूनही अद्याप हे पथदीप का बसविण्यात आलेले नाहीत, याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी. त्याचवेळी चार वर्षे निधी पडून राहिल्याने त्याचे व्याजही ग्रामपंचायतीला मिळावे.
 - योगेश नकाशे, चिखलगाव सरपंच

Web Title: rajapur news road grampanchayat