धरणात पाणी; टंचाईग्रस्तांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

राजापूर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसाने तालुक्‍याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये भासणाऱ्या पाणीटंचाईला दिलासा मिळाला आहे. कोदवली धरणामध्ये पाणीसाठा झाला असून शहरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उकाड्यामुळे तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. २१ गावे आणि २९ वाड्यांना टॅंकरची मागणी दीड महिन्यापूर्वी केली होती; मात्र अद्यापही पंचायत समितीने या गावांना टॅंकरने पाणी दिलेले नाही. कोदवली धरणामध्ये खडखडाट झाल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. शीळ जॅकवेलच्या येथून पाणी खेचण्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा अडथळा येत असल्याने शहरातील पाणीटंचाईची स्थिती बिकट होती. त्यामुळे पालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही गेल्या काही दिवसांमध्ये कोलमडले होते. गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे तालुक्‍यासह शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. कोदवली धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सायबाच्या धरणात पाणीसाठा झाल्याने शहरातील पाणीपुरवठा लवकरच नियमितपणे सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरडी पडलेली अर्जुना आणि कोदवली नदी प्रवाहित झाली आहे. पाण्याचा प्रवाह वाढताच पालिका प्रशासनाने अर्जुना नदीवर कोंढेतडवासीयांना जाण्यासाठी हंगामी स्वरूपामध्ये बांधलेला पूल आज सकाळी काढला. कोंढेतड पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने नदीपलीकडे जाण्यासाठी कोंढेतडवासीयांची सोय झाली आहे.

Web Title: rajapur rain