
राजापूर : पूरपरिस्थितीमुळे राजापुरातील आर्थिक उलाढाल रोडावली
राजापूर : संततधार पावसामुळे पूरस्थिती कधी कमी, तर कधी जास्त होते. नेहमीच्या या स्थितीत या वर्षीही फारसा फरक पडलेला नाही. पूरस्थितीच्या काळात माल सुरक्षित ठिकाणी हलविणे आणि पूर ओसरताच पुन्हा मालाचा दुकानात भरणा करावा लागत आहे. या साऱ्या धावपळीत रोडावणाऱ्या आर्थिक उलाढालीसह मालाची ने-आण करण्यातच व्यापाऱ्यांची अधिकच दमछाक होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून असलेली पूरस्थिती आणि दरवर्षीच्या पूरस्थितीचा अनुभवातून राजापूर बाजारपेठेतील व्यापारी अधिक सतर्क झाले आहेत. पूराचे पाणी दुकानामध्ये घुसून नुकसान होण्याच्या शक्यतेने दुकानात आवश्यक तेवढा माल भरून उर्वरित माल सुरक्षित ठिकाणी हलविला जात आहे. पूरस्थितीही नेहमीचीच झाली आहे.
अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येवून पूराच्या पाण्याने काल (ता.4) सायंकाळी शहराला वेढा घातला. काही तासाच्या अवधीमध्ये पाण्याने जवाहर चौकामध्ये धडक दिली. सुमारे सात तासानंतर पाणी ओसरले. तरी, सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर आहे. पूरस्थिती कमी-जास्त होत असली तरी, पुराचा धोका कायम होता. अर्जुना-कोदवली नद्यांची पूरस्थिती येथील व्यापाऱ्यांसाठी मुळीच नवी राहिलेली नाही.
भविष्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन व्यापाऱ्यांकडूनही खबरदारी म्हणून दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवला जात आहे. दैनंदीन विक्रीसाठी आवश्यक असेल तेवढा आणि पूराचे पाणी दुकानात घुसल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविणे शक्य असेल, तेवढाच माल व्यापारी दुकानामध्ये ठेवताना दिसत आहेत. पावसाने जोर धरल्यास काही मिनिटांच्या कालावधीमध्ये पूराचे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये घुसते. त्यामुळे व्यापाऱ्यांची आता दरवर्षीप्रमाणे नेहमीची जागरणे सुरू झाली आहेत.
Web Title: Rajapur Rain Situation Economic Turnover Rajapur Was Disrupted
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..