दहा लाखाची लाच घेताना भूकरमाफकाला पकडले 

दहा लाखाची लाच घेताना भूकरमाफकाला पकडले 

मालवण - येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमाफकाला ठाण्यात लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. राजेंद्र तुकाराम परमसागर (वय 45) असे त्याचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यातील मोजणी केलेल्या जमिनीच्या नकाशाची प्रत देण्यासाठी 30 लाख रुपये रकमेच्या लाचेची मागणी करुन त्यातील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये घेताना तो 'लाचलुचपत'च्या जाळ्यात सापडला. 

ठाणे येथील भूमिअभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर रविंद्र पांडुरंग अरीसरे हा दुसरा संशयित 'गळाला' लागला नसल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई आज करण्यात आली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ठाणे) पोलीस निरीक्षक विलास मते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील एका तक्रारदाराने जमिनीची दीड महिन्यापुर्वी मोजणी करुन घेतली होती. या मोजणीच्या नकाशाची प्रत मिळावी अशा आशयाचा अर्ज संबंधिताने ठाण्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात केला होता. त्यावेळी संबंधित तक्रारदार आणि राजेंद्र तुकाराम परमसागर या दोघांची भेट झाली.

या भेटीत राजेंद्र परमसागर याने मोजणीच्या नकाशाची प्रत देण्यासाठी 30 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दहा लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी संबंधित जमीन मालकाने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. राजेंद्र परमसागर हा 2009 सालपासून 2012 पर्यंत ठाणे येथील भूमिअभिलेख कार्यालयात सर्व्हेअर म्हणून काम करत होता. 2012 साली परमसागर याची मालवण येथे भूकरमापक म्हणून बदली झाली होती. 

तक्रारीनुसार ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास मते यांनी मंगळवारी (ता.16) आपल्या सहकार्यांना घेऊन सापळा रचला. या सापळ्यात परमसागर हा ठाणे येथील विश्रामगृहाजवळील जागेत संबंधित जमीन मालकाकडून दहा लाख रुपये रकमेची लाच घेताना रंगेहाथ सापडला. 

दुसरा संशयित पसार 
दुसरा संशयित रविंद्र पांडुरंग अरीसरे हा लाचलुचपत'च्या जाळ्यात अडकला नाही. याबाबत ठाणे शहर पोलिसात विलास मते यांनी गुन्हा दाखल केला असून परमसागर याच्यावर अटकेची कारवाई केली. या कारवाईच्या पथकात पोलीस निरीक्षक विलास मते, पोलीस नाईक मोरे, गायकवाड, राजपुत हे सहभागी झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com