मराठी वाचताय ना, वाचायलाच पाहिजे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - मराठी भाषेत कुसुमाग्रजांसह अनेक लेखकांनी समृद्ध साहित्य लिहिले आहे. परंतु आपण रोज किती वाचतो, याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने करावा. दररोज वाचनाशिवाय रात्री झोपू नये, असा संकल्प प्रत्येकाने करावा. तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचे पुण्य लाभेल. ‘मराठी वाचताय ना, वाचालयाच पाहिजे...’, असे आवाहन साहित्यिक राजेंद्रकुमार घाग यांनी केले.

रत्नागिरी एसटी विभागातर्फे आज प्रत्येक बस स्थानकात मराठी राजभाषा दिनानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले. मुख्य कार्यक्रम रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकात झाला. या वेळी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात नामवंत लेखकांची पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, नाट्यलेखक विजय साळवी, ज्योती अवसरे, प्रा. शिवराज गोपाळे, विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के, आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद आदी उपस्थित होते. राजलक्ष्मी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. किशोर सुखटणकर यांनी सांगितले की, लहानपणी आई मराठी भाषा शिकवते. परंतु आपण इंग्रजीचा जास्त वापर करू लागतो. आता पालकांनीही घरामध्ये मुलांशी बोलताना मराठीतून बोलावे व तसे संस्कार करावेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळात ग्रंथप्रदर्शन व अन्य उपक्रम राबवू. सौ. अवसरे यांनी मराठी भाषेची महती सांगितली. एसटी महामंडळातर्फे कोणताही उपक्रम लोकाभिमुख केला जातो आणि मराठी भाषा दिनाचा उपक्रम गेल्या वर्षापासून महामंडळ मोठ्या प्रमाणावर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विजय साळवी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे निवडक पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते.

Web Title: rajendrakumar ghag in ratnagiri