नाणारमध्ये रिफायनरी समर्थकांचा मेळावा 3 मार्चला

नाणारमध्ये रिफायनरी समर्थकांचा मेळावा 3 मार्चला

रत्नागिरी - राजापूर तालुक्‍यातील नाणार रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सोमवारी (ता. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माधव भंडारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार आहे. तसेच ३ मार्चला नाणार येथे प्रकल्प समर्थकांचा भव्य मेळावा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात माने पत्रकारांशी बोलत होते. माने म्हणाले, तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या नाणार येथील रिफायनरी प्रकल्प कोकणची प्रगती करणारा आहे.देशाचा जीडीपी दहा टक्‍केने वाढणार आहे. त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी राजापुरात काल (ता. २२) झालेला मेळावा ऐतिहासिक होता.

आतापर्यंत विरोधासाठी लोकांना भडकवले जात होते; परंतु ज्यांना हा प्रकल्प हवा आहे, त्यांच्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. सोमवारी भंडारी यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाळ माने, राजन गोगटे, राजापूर तालुक्‍यातील भाजप पदाधिकारी यांच्यासह विविध प्रकल्प समित्यांचे नेते यामध्ये सहभागी असतील.

प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन घेण्यात आली आहे. अनेक लोक जमिनी देण्यासाठी तयार आहेत. ज्यांची अडचण आहे, त्यांना वगळून अन्य जमीन घेऊन तेथे हा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी केली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे दीड ते दोन लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामध्ये स्थानिक तरुणांचीच भरती होईल,असा करार संबंधित कंपनीकडून केला जाईल. यापूर्वी खासगी कंपन्यांमध्ये परराज्यातील 

लोकांना संधी दिली जाते. यावेळी तसे करणार नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वीस हजार अभियंत्यांना कंपनीत सामावून घेतले 
जाईल, असा विश्‍वास माने यांनी व्यक्‍त केला.

...तर, मत परिवर्तन होऊ शकते
प्रकल्प रद्दच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप युती झालेली आहे; मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सुरू केलेल्या या सकारात्मक प्रयत्नामुळे शिवसेनेची अडचण होणार आहे. युती झाली असतानाही हे प्रयत्न का सुरू केले या प्रश्‍नावर माने यांनी वरिष्ठ निर्णय घेतील, असे सांगितले. प्रकल्पाचे फायदे लोकांना माहीत नव्हते, ते समजल्यावर विरोधकांपैकी काहींचे मत परिवर्तन होऊ शकते,असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com