घोषणांसह गदारोळात हे राम नथुराम 

kankavali
kankavali

कणकवली - रस्त्यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर मंगल कार्यालय परिसरातून शिवसेना कार्यकर्त्यांकडून तेवढेच प्रत्युत्तर. नाटक अर्ध्यावर आल्यानंतर अर्धा तास झालेला विजेचा खेळखंडोबा आणि त्यातच कलाकारांवर झालेली शाईफेक, तर दुसरीकडे नाटकाचा प्रयोग संपेपर्यंत मंगल कार्यालयाबाहेर शिवसैनिक आणि पोलिसांचा खडा पहारा अशा धीर गंभीर वातावरणात हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग झाला. 

ऐनवेळी निश्‍चित झालेल्या लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात रात्री साडेदहाच्या सुमारास हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग सुरू झाला. या नाटकावरून दिवसभर शहरात तणावाचे वातावरण असल्याने जेमतेम शंभर सव्वाशेची तिकीट विक्री झाली होती; मात्र कॉंग्रेसचा विरोध आणि शिवसेनेचा पाठिंबा या राजकीय जुगलबंदीमुळे तालुक्‍यातील शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या मंडळींनी लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय तुडुंब भरून गेले होते. 

नाटक सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते घोळक्‍याने मंगल कार्यालयाबाहेर दाखल झाले. नीतेश राणे झिंदाबाद, महात्मा गांधी अमर रहे आदींच्या घोषणा सुरू झाल्या. त्या पाठोपाठ मंगल कार्यालय परिसरात आलेल्या शिवसैनिकांनीही शिवसेना झिंदाबादचा नारा बुलंद केला. पंधरा मिनिटे सुरू असलेल्या या गदारोळात नाटकातील प्रेक्षकांनी नाटक सोडून मंगल कार्यालयातून राजकीय जुगलबंदीचा आनंद लुटला. काही वेळातच घोषणा देणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. या वेळी झालेल्या धरपकडीदरम्यान कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर या नाटकाचा प्रयोग पुन्हा सुरू झाला. 

नाटकात गांधी वधाचा प्रसंग येण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच संपूर्ण शहराचा वीजपुरवठा गायब झाला. त्यानंतर जनरेटरची शोधाशोध झाली आणि महावितरणच्या नावाने कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला. महावितरणच्या पथकांनी शहरात ज्या ज्या ठिकाणाहून वीजपुरवठा खंडित झाला होता, ती ठिकाणे शोधून वीजपुरवठा पूर्ववत केला. यात अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी गेला. या कालावधीत नाटकातील कलावंतांवर शाईफेकदेखील झाली. त्याचा फटका पहिल्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांनाही बसला. 

रात्री बाराच्या सुमारास पुन्हा नाटक सुरू झाल्यानंतर गांधी हत्येचा प्रसंग आला. या वेळी तिघा महिला कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. महिला पोलिसांनी धाव घेऊन त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. 

शहरात मोठा पोलिस फौजफाटा 
नाटक सुरू होण्यापूर्वी कॉंग्रेस कार्यालय येथे मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते एकत्र आले होते, तर लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे तालुक्‍यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी एकत्र आले होते. याखेरीज शहराच्या काही भागांत राजकीय पक्षांची मंडळी गटाने फिरत होती. त्यामुळे रात्री शहरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मंगल कार्यालयालाही पोलिस छावणीचे रूप आले होते. पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलिस निरीक्षक हेमंत शहा हे स्वत: बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. 

तीन महिला आणि पंधरा कार्यकर्ते ताब्यात 
लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयाबाहेर घोषणा देणाऱ्या पंधरा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना तसेच सभागृहात घोषणा देणाऱ्या तिघा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्वांची नंतर मुक्‍तता करण्यात आली. महिलांमध्ये कविता किरण फोंडेकर (वय 43, रा. कोल्हापूर शिवाजी पेठ), वंदना विलास आळतेकर (वय 36, रविवार पेठ) आणि राजश्री विवेक कर्णिक (वय 38, रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे, तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राजेश उर्फ सोनू सावंत (वरवडे), संदीप मेस्त्री (कलमठ), सचिन तोडणकर (कोल्हापूर), रूपेश कानडे (कुडाळ), रूपेश बिडये (कुडाळ), सूरज जाधव (कणकवली), नितीन पाडावे (माईण), त्रिंबक गवळी (कोल्हापूर), स्वप्नील ठोंबरे (कोल्हापूर), सुजित जाधव, ज्ञानेश अपराज, सुरेश सावंत, आशिष वालावलकर (सर्व कणकवली) आणि सुहास विचारे (वरवडे) यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com