रम्बलरचा फायदा शून्य; धोका जास्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

लोणेरे - मुंबई-गोवा महामार्गावरील विविध ठिकाणी रम्बलर बसवण्यात आले आहेत; मात्र वाहनांची गती करण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. उलट वाहने वेग कमी करताना अपघात होण्याची चिन्हे दिसतात. हे गतिरोधक तयार करताना ‘इंडियन रोड सायन्स’च्या निकषांची अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येते. अत्याधुनिक सस्पेंशन यंत्रणा असलेली वाहने रम्बलरवरून वेगाने गेली, तरी त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे रम्बलर निरुपयोगी ठरत आहेत. 

लोणेरे - मुंबई-गोवा महामार्गावरील विविध ठिकाणी रम्बलर बसवण्यात आले आहेत; मात्र वाहनांची गती करण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. उलट वाहने वेग कमी करताना अपघात होण्याची चिन्हे दिसतात. हे गतिरोधक तयार करताना ‘इंडियन रोड सायन्स’च्या निकषांची अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येते. अत्याधुनिक सस्पेंशन यंत्रणा असलेली वाहने रम्बलरवरून वेगाने गेली, तरी त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे रम्बलर निरुपयोगी ठरत आहेत. 

महामार्गावर अपघातांचा जास्त धोका असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’वर महामार्ग विभागाने हे रम्बलर तयार केले आहेत. धोकादायक वळणे, अपघातप्रवण ठिकाणांची त्यासाठी निवड केली आहे. हे गतिरोधक म्हणजे पांढऱ्या रंगाच्या थर्मोप्लास्टिक मटेरियलच्या पट्ट्या आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील आणि अपघात कमी होतील, असा महामार्ग विभागाचा उद्देश आहे. 

मोटरसायकल, छोट्या व जुन्या बनावटीच्या कार, जुनी वाहने, रिक्षा, मिनीडोअर अशी वाहने रम्बलर बसवलेल्या ठिकाणी वेग कमी करतात. कारण या वाहनांमधील प्रवाशांना तेथून जाताना चांगलेच गचके जाणवतात. आधुनिक महागड्या वाहनांना याचा कोणताही फरक पडत नाही. ट्रक, टॅंकर आणि डम्पर अशी मोठी वाहने तर कोणताही अडथळा नसल्याच्या थाटात येथून वेगाने जातात. 

रम्बलरजवळ महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना तेथे वाहनांचा वेग कमी होईल असे वाटते; मात्र वाहने भरधाव जातात. त्यामुळे वेग नियंत्रणासाठी वेगळ्या उपाययोजनेची गरज आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. अपघात रोखण्यासाठी गतिरोधक आवश्‍यक असल्याने रम्बलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. बहुतांश ठिकाणी या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आली आहे. गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचना फलक लावणे अपेक्षित आहे. असे फलक अनेक ठिकाणी दिसत नाहीत. 

महामार्गालगत गावे आहेत. तेथील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शाळांची मागणीपत्रे लक्षात घेऊन रम्बलर बसवण्यात येतात. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समिती स्थापन केलेली आहे. तालुकास्तरावर तहसीलदार हे काम पाहतात. त्यांच्या आदेशानुसारच रम्बलर बसवण्यात येतात.  भरधाव वाहनाचा वेग कमी करणे हा उद्देश असतो; मात्र वाहनचालकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. सूचना फलक लावण्यात आले आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.
- अमोल माडकर,  कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग.

वळणावर धोका  
महामार्गावर नदीच्या पुलाच्या अलीकडे व पलीकडे रम्बलर टाकले आहेत; मात्र सरळ मार्गापेक्षा वळणावरील अशा गतिरोधकावरून गाडी नेताना ती अस्थिर होऊन अपघात होऊ शकतो, असे मत लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे डॉ. सचिन पोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Rambalara advantage of zero