कोकणी बाण्याचा तडफदार अभिनेता

कोकणी बाण्याचा तडफदार अभिनेता

रत्नागिरी - मराठी रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट काशिनाथ घाणेकर यांनी रंगवलेला ‘लाल्या’ रंगमंचावर साकारणे हे मोठे आव्हान होते. रमेश भाटकर यांनी ते लीलया पेलले आणि ठसाही उमटवला. हा त्यांचा खास कोकणी बाणा. त्यांचे मूळ गाव भाट्ये.

कोकणातील प्रत्येक माणसाप्रमाणे त्यांना आपल्या भूमीची प्रचंड ओढ होती. येथे त्यांना घरही बांधावयाचे होते. रंगमंच, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता आरपार, साधा आणि मनस्वी होता. रत्नागिरीत ते आवडीने येत. या तडफदार अभिनेत्याच्या निधनाने कोकणात हळहळ व्यक्त करण्यात आली. ऑगस्ट २०१७ मध्ये रत्नागिरीत रमेश भाटकर यांनी संगीतकार वडील (कै.) स्नेहल भाटकर यांचे अभंग सादर केले होते.

वडिलांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी गायलेल्या अभंगांची आज रसिकांनी आठवण काढली. त्यावेळी त्यांनी ‘उचनीच काही’, ‘घुमडिया आयो बदरा’, ‘वारियाने कुंडल हाले’ अभंग खूपच छान गायले होते. वडिलांकडून गाणं शिकलो नाही, अभिनेता झालो; पण लहानपणापासून वडिलांसोबत ऐकलेली भजने आजही कानात गुंजतात. मुंबईत मिलमध्ये मराठी व भय्या लोकांसोबतही वडिलांनी भजने गायली. त्यांच्याएवढी माझी तयारी नाही. त्यांची गायकी म्हणजे अभ्यासोनी प्रकटावे अशीच होती, असेही त्यावेळी भाटकर म्हणाले होते. 
त्यांच्याविषयी ज्येष्ठ अभिनेत्री अनुया बाम म्हणाल्या की, बऱ्याच वर्षांपूर्वी देव देव्हाऱ्यात नाही, या नाटकाचा कुडाळला प्रयोग होता. तेव्हा त्यांनी माझ्या अभिनयाचे कौतुक केले होते. पती संगीतकार अवधूत बाम यांचे गुरु म्हणजे त्यांचे वडील. हे भाटकर यांना माहिती असल्याने ते नेहमीच आदराने बोलायचे.

‘‘रत्नागिरीच्या २० भजनीबुवांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी ‘गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी’ हा सोहळा आयोजित केला होता आणि त्यासाठी रमेश भाटकर शूटिंगच्या तारखा रद्द करून आले होते. अण्णांमुळेच मी अभिनेता होऊ शकलो; पण त्यांच्यासारखा गायक होऊ शकलो नाही, अशी खंत ते बोलून दाखवायचे.’’
- ॲड. संदेश नागवेकर

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या निधनामुळे अभिनयातील ‘कमांडर’ गेला आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत त्यांनी अभिनयाची छाप उमटवत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी कलाकार कायमचा गमावला आहे.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com