सत्तेमुळेच राणेंचे भाजप प्रेम उफाळले - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मालवण - दहा वर्षांपूर्वी भाजपही मेलेली पार्टी असे हिणविणाऱ्या नारायण राणे यांची पक्षात येण्यासाठी आज धडपड सुरू आहे. केंद्रापासून राज्यात असलेल्या सत्तेमुळेच त्यांचे भाजप प्रेम उफाळून आले आहे. शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी भाजपमध्ये का प्रवेश केला नाही? त्यावेळी त्यांचे हे प्रेम कुठे गेले होते? आता ते भाजपवर दाखवत असलेले प्रेम बेगडी आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, ""दहा वर्षांपूर्वी राणेंनी शिवसेना सोडली. त्यावेळी अडचणीत असलेल्या भाजपला सावरण्यासाठी ते का पुढे आले नाहीत? या उलट मी माझे सर्व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या ताकदीच्या जोरावर जिल्ह्यात भाजप संघटना वाढविली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने सत्तेचे पिकलेले फळ त्यांना दिसल्याने त्यांचे भाजपवरील प्रेम उफाळून आले आहे; मात्र दुरून डोंगर साजरे याप्रमाणे त्यांच्यापासून लांब राहणेच सोयीचे आहे. राणेंना पक्षात घ्यायचे की नाही याचा अधिकार आपल्याला नाही. तो अधिकार वरिष्ठांना आहे; मात्र राणेंच्या प्रवेशाबाबत आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे योग्य वेळ येईल; तेव्हा माझी भूमिका स्पष्ट करेन.''

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तालुक्‍यात भाजपच्या पदरी अपयश आले. यावर श्री. जठार म्हणाले, 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या अपयशाने आम्ही खचून जाणार नाही. भविष्यात जिल्ह्यात भाजपची ताकद सर्वत्र दिसून येईल. संकटाच्यावेळी जो मदतीसाठी धावून येतो तोच खरा मित्र असतो. पक्ष ज्यावेळी अडचणीत असतो; तेव्हा पक्षाला सहकार्य करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये.''
तालुक्‍यातील आठ हजार शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. अन्नसुरक्षा कायद्यात सर्व शिधापत्रिकाधारक कसे समाविष्ट होतील यादृष्टीने प्रयत्न होते; मात्र पूर्वीपासून जी व्यवस्था होती त्यात धान्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र बायोमेट्रिक प्रणालीच्या वापरामुळे येत्या काळात ही सुविधा सुरळीत होईल. सध्या जे शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित होत आहेत, त्याची माहिती घेत योग्य ती पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

"दुरून डोंगर साजरे' याप्रमाणे नारायण राणे यांच्यापासून लांब राहणेच सोयीचे आहे.'
- प्रमोद जठार, भाजप, जिल्हाध्यक्ष

Web Title: rane bjp love by power