राणेंनी ध्रृतराष्ट्राची पट्टी काढावी- राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

सावंतवाडी : नारायण राणे यांनी डोळ्याला बांधलेली ध्रृतराष्ट्राची पट्टी काढून टाकावी आणि आपले पुत्र नीतेश राणे यांना आवरावे. यापुढे जिल्ह्यात दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

सावंतवाडी : नारायण राणे यांनी डोळ्याला बांधलेली ध्रृतराष्ट्राची पट्टी काढून टाकावी आणि आपले पुत्र नीतेश राणे यांना आवरावे. यापुढे जिल्ह्यात दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

तेली यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कणकवली येथे काल (ता. 20) पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. त्याला तसेच प्रथमेश तेली हल्ला प्रकरणाबाबत श्री. तेली यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, "राणेंनी आपल्या डोळ्यावर ध्रृतराष्ट्रासारखी पट्टी बांधलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांकडून काय चालले आहे, हे लक्षात येत नाही. आपला मुलगा गुणवंत आहे, असे राणेंचे म्हणणे असेल तर मुंबई येथे घडलेले चिंटू शेख प्रकरण काय आहे? गोवा टोलनाक्‍यावर कोणी धुडगूस घातला? आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हरटेक करून रस्त्यावर कोणी गोंधळ घातला होता? वडिलांच्या वयाचे असलेल्या श्रीकांत सरमळकर आणि जयवंत परब यांच्याशी अरेरावी करणारा कोण? गडकरी पुतळा प्रकरणात जातीयभेद निर्माण करून पुतळा मोडणाऱ्या लोकांना बक्षिसे कोणी दिली? पालिका निवडणूक काळात अजित गोगटे यांच्या कार्यालयावर अंडी कोणी फेकली? मुंबई येथील एका बिल्डरने आमदार राणेंना अटक करावी, अशी याचिका का दाखल केली? व्हॉटस्‌ऍप तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांची टिंगलटवाळी कोण करतात, याचा अभ्यास राणे यांनी करावा. यापेक्षासुद्धा माझ्याकडे मोठी लीस्ट आहे.''

श्री. तेली म्हणाले, ""माझा मुलगा प्रथमेश तेली यांच्यावर हल्ला करून आपल्या पगारी टीमकडून जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांची बदनामी या मागे त्यांचाच हात होता. ते लक्षात आल्यामुळे मी काहीच बोललेलो नाही. आमदार राणे यांनी कायम आपल्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिलेला आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सोडलेले नाही. त्यामुळे आता हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. गोवा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेतली आणि ही दादागिरी मोडून काढण्याची मागणी केली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अतुल काळसेकर आदी सर्वजण उपस्थित होते.''

श्री. तेली म्हणाले, ""जिल्ह्यात युतीची ताकद वाढत आहे, याचे भान श्री. राणे यांना आले आहे. त्यामुळे ते माझ्यासह शिवसेना-भाजपच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी काल राणे कुटुंबातील सदस्यांना सोडून जिल्ह्यातील सर्वांना टार्गेट केले. दुसरीकडे ते बंद प्रकल्पाबाबत बोलले; मात्र राणेंनी आपल्या काळात फक्त प्रकल्प जाहीर केले. ते प्रत्यक्षात मार्गी लावण्याचे काम आमच्या काळात होत आहे. त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. भविष्यात येणाऱ्या निवडणुकात जिल्ह्यात शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे त्याचा धसका राणेंनी घेतला आहे.'' या वेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, दादा मालवणकर, शामी केनवडेकर, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.

माझ्याशी वैर तर माझ्यावर "ऍटॅक' करा!
माझ्यावर राग असल्यास थेट माझ्यावर ऍटॅक करा. माझ्या कुटुंबीयांवर किंवा मुलावर हल्ला करून काय सिद्ध केले? राजकारणात अशी घाणेरडी नीती वापरली जात आहे, हे ऐकून संबंधितांच्या पक्षातील लोकांकडून आमची शरमेने मान खाली जात आहे. त्यांनी कोणती पातळी ओलांडली याचा अंदाज येतो; परंतु या प्रकाराची आपण मुख्यमंत्र्याकडे आज तक्रार केली असल्याचे तेली म्हणाले.

Web Title: rane should change his perspective: rajan teli