बँक बॅलन्स नाही, रोज आम्ही खायचे काय ? रांगोळीतून मांडल्या भावना

मकरंद पटवर्धन
Monday, 31 August 2020

तब्बल 18 तास मेहनत घेऊन 3 बाय 4 फुटांची ही रांगोळी त्यांनी गयाळवाडी येथील राहत्या घरी काढली आहे.

रत्नागिरी : 'कोरोनामुळे केला लॉकडाऊन, सुखी संसाराला लागली झळ, थांबला विश्‍वाचा पसारा, हे विघ्नहर्ता, सावराया द्या बळ' अशी विनंती करणार्‍या हातावर पोट असणार्‍या कष्टकरी जोडप्याला गणेश आशिर्वाद देत असल्याची बोलकी रांगोळी राहुल कळबंटे यांनी साकारली. तब्बल 18 तास मेहनत घेऊन 3 बाय 4 फुटांची ही रांगोळी त्यांनी गयाळवाडी येथील राहत्या घरी काढली आहे.

हेही वाचा - Good News : महाराष्ट्र-गोवा सीमा उद्यापासून खुल्या...

मुळच्या मालगुंड येथील कळंबटे युवा रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. यापूर्वी थ्रीडी रांगोळीमध्ये राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक पटकावणार्‍या कळंबटे यांनी कोरोना महामारी आणि गणेशोत्सव समोर ठेवून ही नवी रांगोळी केली आहे. सुरवातीला ब्राऊन पेपरवर स्केच काढून त्यावर रांगोळीची सुरेख पेरणी केली. बाटल्या गोळा करून चरितार्थ चालवणार्‍या एका दांपत्याचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर फिरत होता. याच फोटोवरून पुढे रांगोळी साकारायची असा विचार कळंबटे यांनी केला. नंतर कल्पना सुचली आणि याला जोड देत विघ्नहर्त्याकडे कोरोनावर मात करण्याचे बळ आणि संसार सावरण्याची विनंती अशी रांगोळी साकारली.

हेही वाचा -  तारिख पें तारिख अजून किती वर्षे वाट पाहायची ?

कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेकजण घरूनच काम करत आहेत. शाळा बंद आहेत. हातावर पोट असलेल्या लोकांचे यापेक्षा अधिक हाल होत आहेत. बँक बॅलन्स नाही, रोज खायचे काय अशी समस्या त्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना मांडण्यासाठी ही रांगोळी साकारली. या रांगोळीसाठी सुमारे पाच किलो रांगोळी व रंग लागले. याकरिता कळंबटे यांचे विद्यार्थी रवी राठोड व किरण राठोड यांनी मदत केली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rangoli design made by rahul kalambate show a situation of corona in ratnagiri