अत्याचार प्रकरणः ‘ते’ लॉज सील करण्याचा प्रस्ताव

अत्याचार प्रकरणः ‘ते’ लॉज सील करण्याचा प्रस्ताव

सावंतवाडी - पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील युवतीचा फेसबुक फ्रेंड व सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय २८, रा. आकेरी घाडीवाडी); तसेच अन्य संशयित प्रशांत कृष्णा राऊळ व राकेश कृष्णा राऊळ (दोघे वय २३, रा. मळगाव, कुंभार्ली) या तिघांना घटनेनंतर १२ तासांच्या आत अटक केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडला, त्या लॉजचा परवाना रद्द करणे; तसेच लॉज सील करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. 

हा प्रकार रेल्वेस्टेशनच्या परिसरात घडल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला याबाबत पत्र देण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपास व अन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले.
संशयितांना काल (ता. २३) दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर ता. २७ पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

सराईत गुन्हेगार घाडी याची प्रशांत व राकेश याच्याशी तोंडओळख असून तालुक्‍यातील युवतीला मित्रासोबत कोल्ड्रिंक पीत असलेले पाहून घाडी याने ‘गाडीवर बस; अन्यथा घरच्याना सांगेन,’ अशी धमकी देत गाडीवर बसवून तिला रेल्वेस्टेशन येथील लॉजवर नेले. पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करत अत्याचार केला. त्यानंतर लॉजच्या खाली आणत पेट्रोल भरून येतो, असे सांगून तिला प्रशांत व राकेश राऊळ या दोन्ही जुळ्या भावांकडे सुपूर्त केले. राऊळ बंधूंनी रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सकाळी पीडित युवतीने मित्राला, तसेच घरच्यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास करण्यात येणार आहे. पीडित युवती अल्पवयीन असूनही तिला लॉजमध्ये घेऊन जाण्यास घाडी याला परवानगी कशी मिळाली, शिवाय ओळखपत्र का तपासण्यात आले नाही यावरून लॉजमालक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लॉजमालकावर कारवाईसाठी मागणी होत आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लॉज परवाना रद्द व्हावा, लॉज सील करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. राऊळ बंधूंची एक दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे. तिघांविरुद्ध सामूहिक बलात्कार, अपहरण, बालहक्क लैंगिक अपराधापासून संरक्षण-२०१२ च्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य सराईत असलेल्या घाडी याचीही दुचाकी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे श्री. धनावडे यांनी सांगितले. 

‘‘तिघांविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल, या दृष्टीने प्रयत्न राहील. या तपासात मी विशेष लक्ष देत आहे.’’
- सुनील धनावडे
, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com