रायगड किल्ला संवर्धनाच्या कामाला गती; संभाजीराजेंनी केली पाहणी

सुनील पाटकर
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

महाड : रायगड किल्ला संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे काम केले जाईल, असे सांगितले.

महाड : रायगड किल्ला संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे काम केले जाईल, असे सांगितले.

वारंवार आवाज उठल्यानंतर शासनाने रायगडसह राज्यातील विविध किल्ल्यांच्या संवर्धनाकरीता एक प्राधिकरण तयार केले. या रायगड प्राधिकरण विभागाकडून सध्या रायगडाच्या विविध घटकांचा अभ्यास करून संवर्धन आणि पर्यटक, शिवप्रेमींना गरजेच्या सोयीसुविधांचे काम केले जाणार आहे. यामध्ये रायगडावरील ऐतिहासिक वास्तू, पाय-यांचा मार्ग, प्रकाश योजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी 600 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 59 कोटी रूपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. यामधून रायगडच्या विविध पाण्याचे स्त्रोत दुरूस्त करणे, ऐतिहासीक वास्तूंची कामे, पायरी मार्ग, महाड रायगड मार्ग यांची कामे केली जात आहेत.

रायगडावरील 21 टाक्यांचा गाळ काढण्याचे काम पूर्ण तर हत्ती तलावाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामांची पाहणी आज खा.संभाजीराजे यांनी केली. काम सुरू असल्याने गडाचा पायीमार्ग बंद करण्यात आला आहे. याला पर्याय असलेल्या नाना दरवाजाचेया कामाची माहितीदेखील यावेळी खा.संभाजीराजे यांनी दिली. त्यांच्यासोबत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, रायगड प्राधिकरणाचे विश्वनाथ सातपुते, आरेखक वरूण भामरे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील बुर्ले उपस्थित होते.

पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम केले जात असून, ऐतिहासिक वास्तूंना शोभेल असेच काम केले जाणार आहे. याकरीता लागणार दगड हा याच ठिकाणांहून गोळा केला जात आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली चुना, आणि विविध नैसर्गीक घटकांचा वापर करून येथील बांधकाम केले जात आहे.

रायगडावरील सर्व कामे सुरू झाल्यानंतर जवळपास 350 ते 400 स्थानिकांना याठिकाणी रोजगार मिळणार आहे. या परिसरातील 21 गावांच्या मुलभूत सुविधांकरीता देखील प्राधिकरण काम करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांकरीता 8 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रायगडावरील विजेची व्यवस्था ही भूमिगत असून गंगासागर तलावाजवळ असलेल्या मनोऱ्यांजवळ लाईट शोची निर्मिती केली जाणार आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid construction of the Raigad Fort Sambhaji Maharaj did the survey