काळ नदीत आढळले दुर्मिळ पाणमांजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

काळ नदीच्या पात्रात 5 ते 6 पाणमांजरांचा कळप आढळून आला आहे. माणगाव येथील हौशी छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांनी या पाणमांजराच्या कळपाचे छायाचित्रण बुधवारी दुपारी केले.

अलिबाग - भारतीय उपखंडातून दुर्मिळ होत चाललेल्या पाणमांजर या प्राण्यांचे अस्तित्व रायगड जिल्ह्यात आढळून येत आहे. माणगाव तालुक्यातून वाहणार्‍या काळ नदीच्या पात्रात 5 ते 6 पाणमांजरांचा कळप आढळून आला आहे. मासे, कोळंबी, खेकडी खाऊन उपजीविका करणारे हे पाणमांजर काळ नदीच्या पात्रात मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. 

Otter (Water Cat)

माणगाव येथील हौशी छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांनी या पाणमांजराच्या कळपाचे छायाचित्रण बुधवारी दुपारी केले. भारतीय उपखंडात आढळणारे हे पाणमांजर (इंडियन स्मूथ-कोटेड ऑटर) वजनाने सर्वात जास्त वजजनाचे असतात. पूर्ण वाढ झालेले हे प्राणी 7 ते 11 वजनाचे असतात. सस्तन प्राण्यांमधील ही प्रजाती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर होती. वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 नुसार पाणमांजरांना संरक्षण देण्यात आले आहे. काळ नदी परिसरातील उतेखोल येथे नैसर्गिक अधिवासामध्ये त्यांची वाढ होत असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे.

Otter (Water Cat)

नदीमध्ये आढळणारे मोठ्या प्रमाणातील मासे, खेकडी खाऊन ते आपली उपजीविका करत असतात. सहसा मानवी वस्तीपासून दूर राहणारे प्राणी आता या परिसरात सहजपणे दिसत आहेत. साधारणपणे मोठ्या उंदरासारखे दिसणारे प्राणी गोड्या पाण्यात राहणे पसंत करतात. रायगड जिल्ह्यात आढळलेल्या या प्राण्यांच्या अस्तित्वाने प्राणी मित्रांमध्ये आशेची किरण पसरले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rare Otters found in kaal river at Alibaug