चिंचाळी धरण पावसात ओव्हरफ्लो, उन्हाळ्यात कोरडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मंडणगड - पावसाळ्यात काही दिवसांतच पाण्याने तुडुंब भरून ओव्हरफ्लो होणारे तालुक्‍यातील चिंचाळी धरण गळतीमुळे एप्रिल महिन्यातच रिकामे होते. त्यामुळे अडतीस वर्षांनंतरही त्यावर उपाययोजना न केल्याने प्रकल्प कशासाठी बांधण्यात आला आहे, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही.

मंडणगड - पावसाळ्यात काही दिवसांतच पाण्याने तुडुंब भरून ओव्हरफ्लो होणारे तालुक्‍यातील चिंचाळी धरण गळतीमुळे एप्रिल महिन्यातच रिकामे होते. त्यामुळे अडतीस वर्षांनंतरही त्यावर उपाययोजना न केल्याने प्रकल्प कशासाठी बांधण्यात आला आहे, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही.

तालुक्‍यातील चार धरणांपैकी १९७९ ला चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. २.१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठवण्याची क्षमता असून परिसरातील १३८ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची अपेक्षा होती. त्यासाठी १० कोटींवर खर्च करण्यात आला; मात्र ३८ वर्षांनंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. याला कारण स्थापत्यशास्त्रातील तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे की यंत्रणेला लागलेल्या गळतीमुळे हे गुलदस्त्यात आहे. प्रत्येक वेळी निधीचा अभाव हेच कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे या धरणाचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी प्रत्यक्षात कधी सुरू होईल हे सांगणे कठीण आहे. चिंचाळी धरण बांधण्याच्या खर्चापेक्षा अधिक खर्च डागडुजीवर झाला आहे. धरणाच्या पाण्यावर दुबार पीक, फळपीक घेण्याकरिता पाणी का नाही असे एकाही शेतकऱ्याने शासकीय यंत्रणेला विचारलेला नाही. 

या धरणावर केलेला खर्च वाया जाण्याच्या स्थितीत असताना स्थानिक नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आगामी काळात कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धरण पूर्ण न झाल्याने यामागचा मूळ उद्देशच साध्य झालेला नाही. यामुळे हा धरण प्रकल्प कोणत्या कारणांनी रखडला यांचे अवलोकन सर्वच संबंधितांनी करण्याची गरज आहे. 

चिंचाळी धरण बांधून पाणी अडविण्यापूर्वी याचे कालवे खोदण्यात आले होते. याला मरण्याची वाट बघत लाकडे स्मशानात नेऊन ठेवायची अशी स्थिती म्हणावी लागेल. याची दोनदा भूमिपूजन करणाऱ्या नेत्यांनी त्याच्या बांधकामकडे मात्र दुर्लक्ष केले. पंचक्रोशीतील अनेक गावे टंचाईग्रस्त आहेत. तरीही त्यांना पाण्याचं महत्त्व कळलेलं नाही. विहिरी आटल्या की धरणात वाकून बघायचं. जनजागृती केल्यानंतर तरी जागे व्हा.
- रमेश घडवले, निवृत्त एसीपी व चिंचाळी ग्रामस्थ

Web Title: ratnagir news chinchani Dam overflow