रत्नागिरीकरांनीही घेतला पर्यटकांच्‍या भूमिकेतून आनंद

रत्नागिरीकरांनीही घेतला पर्यटकांच्‍या भूमिकेतून आनंद

रत्नागिरी -पर्यटन महोत्सव काळात स्थानिक रत्नागिरीकरांनीही पर्यटकांच्या भूमिकेत जाऊन आनंद घेतला. यामुळे शहरातील काही स्थळे आणि उपक्रम यात येथील नागरिक प्रथमच सहभागी झाले. महोत्सवाचे यश फुगवून सांगितल्यासारखे वाटले, तरी यानिमित्ताने पर्यटनाची काहीशी झलक अनुभवायला मिळाली. पर्यटन संस्कृती रुजण्याच्या दृष्टीने व ती वाढण्यासाठी याचा उपयोग निश्‍चित होईल.

यानिमित्ताने रत्नागिरी व परिसरातील अनेक पर्यटनस्थळे शहरवासीयांनाही प्रथमच अनुभवायला मिळाली. मुक्तांगणसारख्या कार्यक्रमात एक हजार महिला सहभागी झाल्या होत्या. तेथे महिलांनी आनंद घेतला. दोन ठिकाणी हॅप्पी स्ट्रीट उपक्रम राबविण्यात आला. त्यात अडीच हजारहून अधिक लोक सामील झाले. पोलिस वापरत असलेली शस्त्रे फोटोऐवजी प्रत्यक्ष हाताळता व पाहता आली. रत्नदुर्ग किल्ल्याचा आगळावेगळा साज स्थानिक पर्यटकांनी अनुभवला. बालेकिल्ल्यात लावलेल्या दोनशे मशालींनी उजळलेला किल्ला पाहणे अविस्मरणीय होते. भगवती मंदिरात नवरात्रात जाणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त अशी गर्दी किल्ल्याने प्रथमच अनुभवली. पाच हजारांहून अधिक लोकांनी तेथे भटकंती केली. तेथेच साहसी खेळांचे-रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, केव्ह ट्रेनिंग आयोजित केले होते. हजारापेक्षा अधिक लोक त्यात येण्यास इच्छुक होते; मात्र फक्त ७०० जणांनाच याचा लाभ देता आला, अशी माहिती सुधीर रिसबूड यांनी दिली. भाट्ये-कर्ला खाडीत तर नौकानयनाचा आनंद तीन हजार लोकांनी घेतला. रत्नागिरी दर्शन एसटी बसचा वापर तीनशे प्रवाशांनी केला. 

करमणुकीच्या कार्यक्रमाला तीस हजारांहून अधिक लोक तीन दिवसांत हजर होते यामध्ये विशेष नाहीच. त्यामुळे आर्थिक उलाढालीला चालना मिळाली. यासह स्थानिक कलाकारांनाही वाव मिळाला. आणि येथील लोककला आणि कलाकारांची क्षमता पर्यटकांप्रमाणेच स्थानिकांसमोर सादर झाली, तेव्हा अनेकांना आपल्याच आसपासचे कलाकार किती वेगळे आहेत, हे अनुभवायला मिळाले.

मार्केटिंगचा परिणाम चांगला...
पर्यटन महोत्सवाची माहिती देण्यासाठी १५ तरुण मुलांची टीम कार्यरत होती. दहा हजारांहून अधिक पर्यटकांशी त्यांनी आठवडाभरात संवाद साधला. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गातील पर्यटक हातखंब्याकडून जात असताना या टीमकडे मागे आले आणि सिंधुदुर्गात करावयाच्या पर्यटन महोत्सवासाठी काम कराल का, दररोज ६०० रुपये मानधन देऊ, असा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे अशा मार्केटिंगचा परिणाम चांगला झाला हेच प्रत्यक्षात अनुभवायला आले. यातून तरुण मुले शिकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com