रत्नागिरी : सडे जैवविविधतेचे सर्वांगसुंदर रूपडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

रत्नागिरी : सडे जैवविविधतेचे सर्वांगसुंदर रूपडे

रत्नागिरी : जिल्ह्यातील कातळ वा अनेक ठिकाणचे सडे म्हणजे येथील जैवविविधतेचा भिन्न-भिन्न आविष्कार असतो. याकडे संशोधकांनी त्यांच्या दृष्टीने पाहिले; पण तो अभ्यास प्रत्यक्षात लोकांच्या चरितार्थासाठी वा अर्थार्जनासाठी उपयोगी पडला नाही. आता काही तरुण मंडळी या सड्यांवरील संपत्तीकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उचलत असलेली पावले हा सुखद बदल आहे. पर्यटनासाठी सध्याचा काळ आणि पुढील दोन महिने उत्तमच ठरतील. या काळात या कड्यांनी रंगीबेरंगी फुलांचा जणू शेलाच पांघरलेला असतो.

दीपकाडीसह इतर फुलांचा नजारा पाहायचा असेल तर साडवलीच्या परिसरात पसरलेला साडेतीन एकराचा परिसर एकदम योग्य ठरतो. यासह राजापूरचे पठार आहेच. या सड्यांवर प्रामुख्याने पावसानंतरच्या हंगामात वनस्पती उगवतात आणि पाऊस संपल्यानंतर पाण्याअभावी त्या नाहीशा होतात. त्यामुळे यांना वर्षायू वनस्पती म्हणतात, अशी माहिती जैवविविधतेचे अभ्यास आणि कातळभूमीवरील फुले, कीटक आदींची माहिती असलेले प्रतीक मोरे यांनी दिली.

येथे पाऊस पडल्यानंतर वेगाने गवत वाढते, वनस्पती वाढतात. त्याला फळे, फुले येतात आणि पाऊस संपता संपता ठराविक काळात संपूनही जातात; मात्र मे महिन्याच्या सुरवातीपासून ते गणपती उत्सव संपेपर्यंतच्या काळात हा कातळसडा वेगवेगळ्या रंगाचे शेले पांघरलेला दिसतो. मे च्या सुरवातीला येथील कोचांना फुले येतात. ही पिवळी वा गुलाबी अशी असतात. त्यानंतर पाऊस झाला की, गवताला येणारी फुलं पांढरी असतात. त्यामुळे शुभ्र शेला असे चित्र दिसते. गवत झाल्यावर आषाढात होणारी म्हणून आषाढ हंबेआम्री असे स्थानिक नाव असलेली वनस्पती पांढऱ्या फुलांसह डोलत असते. यानंतरच्या थोड्या कालावधीत रानकांदा, कोईशिरड असे लिलीचे प्रकार फुलतात. त्यांची फुले पांढरी वा गुलाबी छटेची असतात. त्याची पात आणि फुलं गुलाबीच दिसतात. यानंतर उगवते ती दीपकाडी.

प्रामुख्याने तीन प्रकारचे गवत

या सड्यांवर फक्त फुलं नाहीत किंवा फक्त दहा-बारा प्रकारचीच फुले वनस्पती आहेत, असे नाही. ठिकठिकाणच्या सड्यावरील जैवविविधता वेगळी आहे आणि तेथील स्थानिक लोकांनी ठेवलेली नावंही वेगवेगळी आहेत. साधारणपणे प्रामुख्याने तीन प्रकारचे गवत त्या सड्यांवर वाढते. त्याशिवाय वेगवेगळी शेवाळे आढळतात. खळगे, छोटी डबकी येथे पाणथळ वनस्पती उगवतात. या साऱ्याचे जतन झाले, त्याबाबतच्या जाणिवा सजग झाल्या तर पर्यटन वाढीस लागेल. मात्र, या पर्यटकांकडूनच येथील जैवविविधतेला धोका पोहोचता नये.

दवबिंदू कीटकभक्ष्यी

कातळावर पाणी कमी, मातीही कमी. अशा प्रतिकूल परिस्थितीत या वनस्पती वाढत असतात. दवबिंदू नामाभिदान झालेली वनस्पती चक्क कीटकभक्ष्यी आहे. निसर्गातील केवढा हा अंतर्विरोध. सीतेची आसवं म्हणून ओळखली जाणावी वनस्पती आणि फुले मुळूमुळू नाहीत. ती मांसभक्ष्यी आहेत. सूक्ष्मजीवावर त्यांची गुजराण चालते. पोषणासाठी निसर्गाने घडवलेली ही किमया आहे, असे स्पष्टीकरण प्रतीक मोरे यांनी दिले.

कोमल आयुष्य तेवढ्यावरच संपते...

सुरुवातीला ती जनावरे खातात. मग जी पाती उरतात, ती एककाडी राहते आणि त्यावर फुले येतात. ही फुले पूर्ण माळ भरून टाकतात. यानंतर येतात, ती सीतेची आसवं. त्यांचा निळा-जांभळा रंग म्हणजे आकाशाने आपला रंग भुईवर सांडल्यासारखे वाटते. त्यानंतरच्या गणेशोत्सव काळात सोनकी, कवळा अन् तेरडा उगवतो. त्यांच्या फुलांचा रंग पिवळा-जांभळा. त्यामुळे ही फुले अंगावर ल्यालेला सडा सतत मन मोहून टाकतो. पाऊस संपत आला, की यांचे कोमल आयुष्य तेवढ्यावरच संपते.

Web Title: Ratnagiri Biodiversity Decaying Beautiful

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..