रत्नागिरीचा नगराध्यक्ष आज ठरणार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर अल्प प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शहरातील माळनाक्‍यापासून खालच्या भागातील केंद्रावर चांगले मतदान झाले; मात्र तेथून वरील केंद्रांवर कमी मतदान झाले आहे.

रत्नागिरी - मतदारांमधील निरुत्साहाचा मोठा फटका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या मतदानाला बसला. सायंकाळी साडेपाचपर्यंत सुमारे 47.38 टक्के एवढेच मतदान झाले. घसरलेला टक्का दखल घेण्यासारखा आहे. निवडणुकीतील चार उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कमी मतदानाचा कोणाला फायदा आणि तोटा होणार हे आज स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात येणार असून त्याच्या पाच फेऱ्या होतील. त्यामुळे तास ते दीड तासात निकाल लागणार आहे. 

हेही वाचा - PHOTOS : सुखद ! अन् 118 कासवांची पिल्ले सुखरूप समुद्रात 

पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर अल्प प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शहरातील माळनाक्‍यापासून खालच्या भागातील केंद्रावर चांगले मतदान झाले; मात्र तेथून वरील केंद्रांवर कमी मतदान झाले आहे. राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. या जागेसाठी शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंड्या साळवी, भाजपकडून ऍड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीकडून मिलिंद कीर, मनसेकडून रूपेश सावंत हे चौघे निवडणूक रिंगणात आहेत. कमी मतदान झाल्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशी कॉंटे की टक्कर होणार आहे. 

हेही वाचा - बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल;  कोणाची इच्छा ?

निरुत्साहामुळे 47.38 टक्के मतदान

शहरात एकूण 58 हजार 770 मतदार आहेत. त्यामध्ये 28 हजार 746 पुरुष, तर 30 हजार 023 महिला मतदार आहेत. 49 मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान मतदान झाले. निरुत्साहामुळे 47.38 टक्के मतदान झाले. त्यामध्ये पुरुष 14 हजार 400, तर महिला 13 हजार 444 असे एकूण 27 हजार 844 जणांनी मतदान केले. पन्नास टक्केपेक्षा अधिक मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सायंकाळी सर्व मतदान केंद्रांवरील इलेक्‍ट्रॉनिक मतदान मशिन पालिकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व पेट्या पालिकेत जमा करण्यात आल्या. सोमवारी मतमोजणी होणार असून त्यासाठी 10 टेबल लावण्यात आली आहेत. इलेक्‍ट्रॉनिक मशिन असल्याने एक ते दीड तासात निकाल लागणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri City President Election Result Today Marathi News