Ratnagiri Dam Mishap : ‘सिद्धिविनायक’तर्फे पाच कोटींची मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

चिपळूण - तिवरे दुर्घटनेतील बाधित ५६ कुटुंबीयांना सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली. 

चिपळूण - तिवरे दुर्घटनेतील बाधित ५६ कुटुंबीयांना सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली. 

तिवरेतील फुटलेल्या धरणाला भेट दिल्यानंतर सामंत म्हणाले, आघाडी सरकारमध्ये मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो. तिवरेतील आपदग्रस्तांना सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे मदत करणे शक्‍य आहे, हे मला माहीत होते. या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे तशी मागणी केली.

पक्षप्रमुखांनी आम्हा दोघांशी चर्चा केली. सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत देण्याचे शक्‍य असल्याचे मी पटवून दिल्यानंतर तातडीने ५ कोटी देण्याचे जाहीर केले. या पैशातून घरांसह आपदग्रस्तांना लागणाऱ्या इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना पक्षप्रमुखांनी केली आहे. जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. चिपळुणातील शासकीय जागेत आपदग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन तयार आहे. त्यांना घरे कुठे हवीत, याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. अलोरेतील जागेबाबत मी शिफारस केली आहे. यासंदर्भात मी ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे सामंत यांनी सांगितले. 

आरोप करण्याची जुनी सवय
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेचे भांडवल केले जात आहे. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी मी स्वतः डीपीडीसीच्या बैठकीत केली आहे. विरोधकांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. त्यामुळे काहींची आरोप करण्याची जुनी सवय असल्याचे श्री. सामंत यांनी बोलून दाखवले.

चांगली घरे बांधून देईन
आपदग्रस्तांना म्हाडा संस्थेच्या माध्यमातून घरे बांधून देण्यासाठी माझी तयारी आहे. हे पाच कोटी म्हाडाकडे जमा झाले तर मी स्वतः पुढाकार घेऊन चांगली घरे बांधून देईन, अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap five cores help by Sidhivinayak Trust